अंबाजोगाई : स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयाच्या रक्त प्रयोगशाळेत आज प्लाझ्मा दानाचा पहिला प्रयोग यशस्वीरीत्या करण्यात आला. येथील रक्त प्रयोगशाळेस १४ जुलै रोजी पालकमंत्री धनंजय मुंडे यांचे स्वीय सहायक प्रशांत जोशी यांनी प्लाझ्मा दान दिला. राज्य शासनाचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमीत देशमुख यांनी जुन महिन्यात अंबाजोगाई येथे झालेल्या एका पत्रपरिषदेत जाहीर केल्याप्रमाणे आणि बीड जिल्हयाचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी उपलब्ध करुन दिलेल्या निधीमुळे तसेच वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाच्या सुचनेनुसार अंबाजोगाईच्या स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयाच्या रक्त प्रयोगशाळेत आज प्लाझ्मा दानाचा पहिला प्रयोग यशस्वीरीत्या करण्यात आला.
आशिया खंडातील पहिले ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयाच्या रक्त प्रयोगशाळेत कोरोना रुग्णांसाठी प्लाझ्मा थेरपीसाठी अद्यावत उपकरणाने जुन महिन्यामध्ये उपलब्ध झाली आहेत. जगात कोरोनाच्या महामारी विरोधात विविध उपचारपद्धतीचा अवलंब केला जात आहे, त्यापैकी प्लाझ्मा थेरपी ही एक महत्वाची उपचार पद्धती आहे. कोरोना रोगातून बरा झालेला रुग्ण याकरिता २८ दिवसांनंतर संपूर्ण तपासणीनंतर आपला प्लाझ्मा कोरोनाबाधित रुग्णांसाठी स्वेच्छेने देऊ शकतो. या प्लाझमावर विशिष्ट प्रक्रिया करुन प्लाझ्मातील रक्तद्रव कोरोनाबाधित रुग्णाला देवून तो रुग्ण बरा करण्यासाठी या थेरपीचा उपयोग होतो. रक्तातील प्लाझ्मा विभक्त करण्यासाठी अफेरेसीस मशीनचा उपयोग होतो. प्लाझ्मा दान करण्याचे दायित्व पालकमंत्री मा. ना.धनंजयजी मुंडे यांचे स्वीय सचिव प्रशांत जोशी यांनी स्वत:हून दाखवले. दि.१४ जुलै रोजी प्रशांत जोशी यांनी प्लाझ्मा दान केले. याप्रसंगी अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांनी कोरोनातून ब-या झालेल्या रुग्णांनी प्लाझ्मा दान करण्याचे आवाहन केले.
अंबाजोगाई सारख्या ग्रामीण भागातील गोरगरीब रुग्णांसाठी येथील स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात मोफत उपलब्ध करण्यात अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख, डॉ. राकेश जाधव (वैद्यकीय अधीक्षक), डॉ. शिवाजी बिरारे (विभागप्रमुख शरीर विकृती शास्त्र), डॉ. एस. एस. चव्हाण (सहयोगी प्राध्यापक), डॉ. विनय नाळपे (प्रभारी अधिकारी रक्तपेढी), डॉ. आरती बर्गे, डॉ. नारायण पौळ, डॉ. सुजीत तुम्मोड व रक्त प्रयोगशाळेतील तंत्रज्ञ जगदीश रामदासी, श्रीमती. सोजर गालफाडे, सय्यद मुश्ताक, किरण चव्हाण, परमेश्वर मोरे, शशिकांत पारखे, सर्व निवासी डॉक्टर्स, सर्व रक्तपेढी कर्मचारी वर्ग यांना यश झाले आहे.
पालकमंत्र्यांच्या स्वीय सहायकांनी केले पहिले दानपालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांचे स्वीय सहायक प्रशांत जोशी हे कोरोना संक्रमणातुन बरे झाल्यानंतर त्यांचा प्लाझ्मा घेण्यासाठी त्यांच्याकडे मुंबई-पुणे येथील अनेकांनी संपर्क साधला होता. मात्र परळी शहराचे भुमीपुत्र असलेल्या प्रशांत जोशी यांनी आपल्या जिल्ह्यातील लोकांना उपयोग व्हावा म्हणून प्लाझ्मा दान करण्यासाठी अंबाजोगाईच्या स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयाच्या रक्त प्रयोगशाळेची निवड केली.