बीड : लातूर येथील कोरोनाग्रस्तांच्या संपर्कात आलेल्या शहागड व चौसाळा चेकपोस्टवरील २९ जणांना विलगीकरण कक्षात ठेवले होते. त्यांचे अहवाल निगेटिव्ह आले. सोमवारी रात्री ९ वाजता त्यांना घरी पाठवण्यात आले. रुग्णालयातून बाहेर पडताच पोलीस बँड पथकाने त्यांना सलामी दिली.
आंध्रप्रदेशातून दोन वाहनातून आलेल्या लोकांनी शहागड चेकपोस्टवर प्रवेश देण्यावरुन पोलीस अधिकारी - कर्मचाºयांसह शिक्षक, आरोग्य कर्मचाºयांच्या पथकासोबत हुज्जत घातली होती. प्रवेश नाकारल्यानंतर त्यांनी छुप्या मार्गाने बीडमध्ये प्रवेश करीत पुढे चौसाळा चेकपोस्टवरुन निघून गेले. लातूरमध्ये त्यांचे स्वॅब घेतले असता ते पॉझिटिव्ह आढळले. त्यानंतर त्यांच्या संपर्कात आलेले दोन्ही चेकपोस्टवरील जवळपास २९ जण रविवारी रात्री जिल्हा रुग्णालयातील विलगीकरण कक्षात दाखल झाले होते. त्यांचे स्वॅब सोमवारी निगेटिव्ह येताच सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
ते रुग्णालयातून बाहेर पडताच बँक पथकाने सलामी दिली. तसेच डॉक्टर, पोलीस, कर्मचारी नागरिकांनी टाळ्या वाजवल्या. पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, अपर अधीक्षक विजय कबाडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात, पो.नि. भारत राऊत, डॉ. बाबासाहेब ढाकणे, डॉ. सचिन आंधळकर आदी उपस्थित होते.