बीड : लातूर येथे शनिवारी आठ लोक कोरोनाग्रस्त आढळले आहेत. त्यांनी दोन जीपमध्ये बीड जिल्ह्यातून प्रवेश केल्याने त्यांचा बीड पोलीस व शहागड आणि चौसाळा चेकपोस्टवरील पथकाशी संपर्क आला आहे. अशा २९ लोकांना आयसोलेशन वॉर्डमध्ये दाखल केले असून सर्वांचे स्वॅब तपासणीला घेतले आहेत. यात कर्तव्य बजावणारी यंत्रणा आहे. या सर्वांचे अहवाल निगेटिव्ह यावेत यासाठी संपूर्ण जिल्हा प्रार्थना करीत आहे.
आंध्रप्रदेशमधील आठ लोक ३१ मार्च रोजी रात्री दोन जीपमधून शहागड येथे आले. त्यांना चेकपोस्टवरून प्रवेश नाकारला. त्यांनी कर्तव्यावरील पथकासोबत हुज्जत घातली. तरीही प्रवेश न मिळाल्याने ते शहागडमध्येच मुक्कामी थांबले. सकाळी सात वाजता ते पुन्हा चेकपोस्टवर आले. तरीही प्रवेश नाकारला. नंतर त्यांनी नागझरीमार्गे बीडमध्ये प्रवेश केला. नंतर चौसाळा चेकपोस्टवरही त्यांची तपासणी केली. पुढे ते तुळजापूर, उमरगा मार्गे निलंगा येथे गेल्याचे समोर आले आहे.
दरम्यान, लातूरमध्ये त्यांचा स्वॅब पॉझिटिव्ह येताच बीडची यंत्रणा सतर्क झाली. त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांचा शोध घेणे सुरू केले. बीडमध्ये कोठेच न थांबल्याने इतर लोकांशी संपर्क आला नाही. परंतू चेकपोस्टवर त्यांचा संपर्क आला होता. त्यामुळे शहागड व चौसाळा चेकपोस्टवर कर्तव्यावर असणारे पोलीस, आरोग्य व शिक्षक असे २९ लोकांना आयसोलेशन वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले. रात्री उशिरा त्यांचे स्वॅब घेऊन प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. आजपर्यंत 98 स्वब पाठवले असून 64 लोकांचा अहवाल निगेटिव्ह आलेला आहे. आणखी 34 लोकांचा अहवाल बाकी आहे. दुपार पर्यंत हा अहवाल येण्याची शक्यता आहे.
१५ डिसेंबरपासून महाराष्ट्रात बाहेरचकोरोनाग्रस्त आठ लोकांसोबत आणखी १० लोक आहेत. हे सर्व १८ लोक प्रचार करीत फिरत आहेत. आंध्रप्रदेशातून ते १५ डिसेंबर २०१० रोजी बाहेर पडलेले आहेत. जवळपास साडे तीन महिन्यांपासून ते बाहेरच असल्याचे विश्वसनिय सूत्रांनी सांगितले. दरम्यानच्या काळात त्यांचा शेकडो लोकांशी संपर्क आल्याची भिती व्यक्त केली जात आहे.
सोशल मीडियावरून प्रार्थना कर्तव्य वाजवताना पोलीस, आरोग्य व शिक्षक हे लातूरच्या कोरोनाग्रस्त रुग्णाच्या संपर्कात आले होते. त्यात जवळपास नेकनूर व गेवराईच्या 20 पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या सर्वांचे अहवाल निगेटिव्ह यावेत यासाठी सर्वच स्तरातील लोक सोशल मीडियावरून प्रार्थना करत आहेत.