बीड : जिल्ह्यातील सर्व बॅँकांनी पास उपलब्ध केलेल्या व्यक्तींना बॅँकेच्या सर्व सोईसुविधा संचारबंदीच्या काळातही बॅँकेच्या कामकाजाच्या पूर्ण वेळेत उपलब्ध करुन देण्याबाबत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण तथा जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी आदेश दिले आहेत. त्यामुळे चालन भरणारे तसेच इतर क्षेत्रातील पासधारकांना दिलासा मिळणार आहे.
कोरोना आपत्ती व्यवस्थापनांतर्गत २३ एप्रिलच्या आदेशानुसार जिल्ह्यातील जमावबंदी व संचारबंदीच्या काळात ज्या कामांना सूट देण्यात आली आहे तसेच भविष्यात सूट देण्यात येईल, अशा सर्व कामांशी थेट संबंधित व्यक्तींना व कर्मचाऱ्यांना सध्या चालू असलेल्या कोविड १९. महापोलीस. इन या संकेतस्थळाच्या आधारे पास घेता येते. परंतू या संकेत स्थळावर अर्ज करताना नियुक्त केलेल्या संबंधित शासकीय नियंत्रण अधिकाऱ्याची लेखी शिफारस असणे आवश्यक आहे. मात्र जिल्ह्यातील बॅँकांमध्ये पास उपलब्ध असणाऱ्या व्यक्तींनादेखील विषम तारखेस सकाळी ७ ते ९.३० या वेळेतच बॅँकेशी संबंधित कामाला मुभा दिली जात असल्याचे तसेच या वेळेव्यतिरिक्त कोणत्याही सोयी सुविधा पास असणाऱ्या व्यक्तींनाही देण्यात येत नसल्याचे निदर्शनास आल्याने २९ एप्रिल रोजी सुधारित आदेश जारी करण्यात आला. त्यानुसार बीड जिल्ह्यातील सर्व बॅँकांनी पास उपलब्ध केलेल्या व्यक्तींना बॅँकेच्या सर्व सोयी सुविधा या संचारबंदी काळातही बॅँकेच्या कामकाजाच्या पूर्ण वेळेमध्ये उपलब्ध करुन देण्याबाबत जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी आदेशित केले आहे.