अंबाजोगाई : संचारबंदी शिथिल झाली असताना वेळेत घरी पोहोचण्याच्या घाईमध्ये एका ६१ वर्षीय सेवानिवृत्त शिक्षकाचा अपघातात मृत्यू झाल्याची घटना अंबाजोगाई येथील संत भगवान बाबा चौकामध्ये मंगळवारी दि.७ दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास घडली.गोवर्धन मालोजीराव मुंडे ( ६१) असे अपघातात मृत्यू झालेल्या सेवानिवृत्त शिक्षकाचे नाव आहे.ते परळी तालुक्यातील रत्नेश्वर विद्यालय टोकवाडी येथून दोन वर्षापूर्वी सेवानिवृत्त झाले होते.या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. मूळ धारूर तालुक्यातील गोपाळपुर येथील रहिवासी असणारे सेवा निवृत्त शिक्षक गोवर्धन मुंडे हे सध्या अंबाजोगाई शहरातील नागझरी परिसरात वास्तव्यास होते.कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर लागु करण्यात आलेली संचारबंदी एकदिवसाआड सकाळी ११ ते दुपारी ३ पर्यंत शिथिल होते . या वेळेत भाजीपाला घेऊन मोठ्या धावपळीत घराकडे निघाले असताना त्याची मोटारसायकल पेट्रोल पंपाजवळ उभ्या असणाऱ्या ट्रॅव्हलवर धडकली यात गोवर्धन मुंडे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.संचारबंदी पुन्हा सुरू होण्यापूर्वी काम उरकण्याच्या घाईत त्यांचा अपघात होऊन मृत्यू झाला.पोलीसांनी घटनास्थळी तात्काळ पोहंचून घटनेची अधिक माहिती व पंचनामा केला. मयत मुंडे यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे.
CoronaVirus : वेळेत पोहचण्याच्या घाईत सेवानिवृत्त शिक्षकाचा अपघातात मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 07, 2020 7:12 PM
भाजीपाला घेऊन परतत होते घरी
ठळक मुद्देसंचरबंदी शिथिल वेळ संपत आली होती