बीड : औरंगाबादहून बीडमध्ये आलेल्या कोरोना संशयिताचा स्वॅब घेतला होता. हा स्वॅब सोमवारी निगेटिव्ह येताच सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. परंतु रात्रीच्या सुमारास त्याची प्रकृती अचानक खालावली. त्याला अतिदक्षता विभागात व्हेंटिलेटरवर घेण्यात आले. तरीही मध्यरात्री त्याचा मृत्यू झाला. या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. आता दुसऱ्यांदा 'सारी' चा आजार आहे का, हे तपासण्यासाठी स्वॅब घेऊन पुण्याला पाठविला जाणार आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ अशोक थोरात यांनी दिली आहे .
औरंगाबाद येथे कंपनीत कामास असलेला ३८ वर्षीय व्यक्ती ५ एप्रिल रोजी गेवराई तालुक्यातील महारटाकळी या मूळ गावी आला होता. त्याला लक्षणे जाणवताच शनिवारी रात्री तो उप जिल्हा रुग्णालयात आला. तेथून जिल्हा रुग्णालयात रेफर करुन आयसोलेशन वॉर्डमध्ये रेफर केले. त्याला कोरोनाची जास्त लक्षणे असल्याने सर्वच चिंतेत होते. त्याला स्वॅब घेऊन प्रयोगशाळेत पाठवण्यात आला. रविवारी अहवाल येणे अपेक्षित होते. परंतु तो सोमवारी झाला. सुदैवाने तो निगेटिव्ह असल्याचे सांगण्यात आले. त्याचा अहवाल निगेटिव्ह येताच सर्व यंत्रणेने सुटकेचा नि:श्वास सोडला. परंतु रात्रीच्या सुमारास त्याची प्रकृती अचानक खालावली. मध्यरात्री त्याचा मृत्यू झाला, ही माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ अशोक थोरात यांनी दिली.
स्वॅब तपासणीवर प्रश्नचिन्ह ?
दरम्यान, आतापर्यंत एवढे स्वॅब घेतले परंतु सुदैवाने सर्व निगेटिव्ह आले आहेत. गेवराईच्या रुग्णाला श्वास घेणास त्रास होत होता, त्याच्यात कोरोनाची सर्व लक्षणे जाणवत होती, तरीही स्वब निगेटिव्ह आला. त्यामुळे हे स्ववॅब परिपूर्ण आणि दर्जात्मक घेतले जातात का? याबाबत प्रश्न चिन्ह उपस्थित होत आहे. अनेकांनी याबद्दल चिंता व्यक्त केली आहे.