अंबाजोगाई : दुधाच्या टेम्पोमधून स्थलांतर करणाऱ्या चाळीस मजुरांना अंबाजोगाई ग्रामीण पोलीसांनी ताब्यात घेतले. अंबाजोगाई येथील मुकुंदराज परिसरातील वाण नदीच्या आसपास २४ व तालुक्यातील सोनहिवरा येथे सांगलीहून आलेल्या १६ मजुरांना अंबाजोगाई ग्रामीण पोलीसांनी कारवाई करून ताब्यात घेतले. ही कारवाई अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक महादेव राउत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरिक्षक मनीषा लटपटे व टीमने मंगळवारी दि.३१ केली. सर्व मजुरांची तात्काळ वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून कोरोना व्हायरसचे कुठलेही लक्षणे नसल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.
अधिक माहिती अशी की कोरोना व्हायरस च्या प्रसारास लगाम घालण्यासाठी महसूल व पोलिस प्रशासनाने कंबर कसली आहे. राज्याबरोबर जिल्ह्यांच्या सीमा बंद करण्यात आल्या आहेत. बीडचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी कुठल्याच आड वळणाच्या रस्त्याने प्रवास करता येऊ नये यासाठी रस्ते खोदून गाव प्रवेश बंद करण्याचे आदेश काढले आहेत. त्यानंतरही मजुरांचे स्थलांतर सुरूच आहे. २४ महिला, पुरुष व लहान मुले बुलढाण्याहून उस्मानाबाद जिल्ह्यातील रांजणी मार्गे नॅचरल दुध नावाच्या टेम्पोतून एम.एच.२५ यु.११७६ मांडवा गावास निघाले होते.
दरम्यान अंबाजोगाई येथील मुकुंदराज परिसरातील वाण नदीच्या आसपास अंबाजोगाई ग्रामीण पोलीसांनी ठेम्पो पकडून कारवाई केली.त्याचप्रमाणे तालुक्यातील सोनहिवरा येथे सांगलीहून आलेल्या १४ मजुरांना ताब्यात घेऊन त्यांचे होम क्वारंटाईन करण्यात आले आहे.कुठल्याही मजुरास कोरानाचे लक्षने नसल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.२४ मजुरांना खबरदारी म्हणून होम क्वारंटाईन करण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.