- नितीन कांबळे
कडा : एक वृद्ध व्यक्ती पॉझिटिव्ह आला. त्याला तात्काळ रुग्णवाहिकेतून रुग्णालयात नेऊन उपचार करणे आवश्यक होते. परंतु तब्बल २१ तासानंतर त्याला रुग्णालयात नेण्यात आले. त्यामुळे वृद्धाला कुटूंबापासून दुर रहात पावसाचा सामना करीत कुडाच्या घरात मुक्काम करावा लागला. हा प्रकार आष्टी तालुक्यातील टाकळसिंग येथे उघडकीस आला आहे. आरोग्य विभागाचा गलथान कारभार या निमित्ताने चव्हाट्यावर आला आहे.
टाकळसिंग येथील एका ६२ वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लक्षणे होती. त्यांना उपचारासाठी नेले असता स्वॅब घेतला. सोमवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमरास त्यांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा कॉल त्यांच्या मुलाला आला. थोडा वेळात रुग्णवाहिका त्यांना घेण्यास येईल, असा निरोपही मिळाला. मात्र, रात्रभर वाट पाहिली तरी रुग्णवाहिका आलीच नाही. शिवाय दुसऱ्या दिवशी दुपारी १२ वाजेच्या सुमारास वारंवार संपर्क केल्यानंतर रुग्णवाहिका येऊन त्यांना ग्रामीण रुग्णालयात घेऊन गेली. तोपर्यंत २१ तास या वृद्धाला अडचणींचा सामना करीत कुडाच्या घरात मुक्काम करावा लागला. टाकळसिंग प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून उंटावरून शेळ्या हाकण्याचे काम केले जात आहे. त्यांच्या दुर्लक्षामुळेच या वृद्धाचे हाल झाल्याचा आरोप केला जात आहे. विचारणा केल्यावर आमची ड्यूटी दुसरीकडे आहे, असे सांगून वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून जबाबदारी झटकण्यासह टोलवाटोलवी केली जात होती. या प्रकाराने आरोग्य विभागाबद्दल तीव्र संताप व्यक्त होत आहे.
बरे वाईट झाल्यास जबाबदार कोण?आमचे वडील आजारी आहेत. रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचे समजल्यावर ते खुप खचले होते. त्यातच ते वृद्ध असल्याने त्यांची सहनशिलताही कमी होती. अशा वेळेस काही बरे वाईट झाल्यास जबाबदार कोण? असा सवाल वृद्धाच्या नातेवाईकांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे आरोग्य विभागासह नियोजन करणाऱ्याबद्दल संताप व्यक्त होत आहे.
सोमवारी रात्री दोन वेळा फोन केला होता, पण बंद होता. म्हणून मी तसा मेसेजही पाठवला होता. आता परत फोन करून विचारते. सोमवारी रुग्णवाहिका बीडला होती.- निलीमा थेऊरकर, नायब तहसीलदार, आष्टी
जास्त रुग्ण असल्याने थोडा वेळ लागला. आता त्या रुग्णाला आष्टी ग्रामीण रुग्णालयात घेऊन जात आहोत. रुग्णवाहिकांची संख्या कमी असल्याने अडचणी येत आहेत.- डॉ.संतोष कोठुळे, तालुका आरोग्य अधिकारी, आष्टी