माजलगाव : कोरोनामुळे सर्वत्र लॉकडाऊन असून सर्व जिल्ह्याच्या सीमा सील करण्यात आल्या आहेत. अशा परिस्थितीत पुण्यातील वाघोली येथे रस्त्याच्या कामावर खडी फोडण्याचे काम करणारे सहा कुटुंबातील ३३ मजूर एका टेम्पोला स्टीकर लावुन टेम्पोतून परभणी जिल्ह्यात जात होते. बीड जिल्ह्याच्या हद्दीवरील गंगामसला चेकपोस्टवर सोमवारी दि. १३ सकाळी पोलिसांनी पकडले. चालक, मालक, क्लीनरवर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून सर्व मजुरांची अलगीकरण कक्षात रवानगी केली आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशासह संपूर्ण राज्यात लॉकडाऊन करून प्रशासनाने सर्व नागरिकांना आहे त्याच ठिकाणी राहून घरात बसण्याचे आवाहन केले आहे. अशा परिस्थितीत हातावर पोट भरणाऱ्या गोरगरिबांचे मोठे हाल होत असून त्याच्या गावाकडे जाण्यासाठी धडपड करीत आहेत. अनेक क्लुप्त्या लढवून घर जवळ करण्याचा प्रयत्न करीत आहेत. गोंडगे पिंपरी (जी. परभणी) येथील सहा कुटुंब मागील २० दिवसापासून पुणे येथील वाघोली येथे अडकून पडले होते. सर्वजण रस्त्याच्या कामावर खडी फोडण्याचे काम करीत होते. गुत्तेदाराने लक्ष देत नसल्याने त्यांनी रविवारी (ता.१२) रात्री रेशन धान्याची चिठ्ठी लिहिलेल्या एका टेम्पोतून लेकराबाळासह गावाकडे प्रवास सुरु केला.
पुणे, नगर जिल्ह्याच्या हद्दी चुकवीत सोमवारी (ता.१३) ते बीड, परभणी जिल्ह्याच्या हद्दीवर असलेल्या गंगामसला चेकपोस्टवर आले. पोलिसांना संशय आल्याने टेम्पोची तपासणी केली असतान आतमध्ये नागरीक असल्याचे आढळून आले. यामुळे पोलिसांनी टेम्पो ताब्यात घेऊन ग्रामीण पोलीस ठाण्यात वरील तिघांवर गुन्हा दाखल केला असून सर्व मजुरांची माउली लॉन्स येथील अलगीकरण कक्षात रवानगी केली आहे.