- पुरूषोत्तम करवा माजलगाव : तालुक्यातील कोरोना बाधितांचा आकडा वाढतच चाललेला असताना गुरुवारी पुन्हा १२ रुग्ण पॉझिटीव्ह निघाले असून यातील ११ रुग्ण नित्रुड तर, एकजण सुर्डी येथील आहे. नित्रुडचे सर्वजण मुंबईहुन आलेले असून सुरवातीला त्यांना जिल्हा परिषद शाळेत ठेवण्यात आले होते; परंतु सरपंचाच्या नातेवाईकांना घरी ठेवण्यात आल्याने शाळेत ठेवण्यात आलेले घरी निघुन गेले.त्यानंतर ते अनेकांच्या संपर्कात आल्याचे बोलले जात आहे.
चार दिवसापूर्वी जिल्ह्यासह तालुक्यात एकही कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण नव्हता परंतु; हिवरा येथील मुंबईहून आलेला एकजण तर, दोन दिवसानंतर बाजूलाच असलेल्या कवडगावथडी येथील मुंबईहूनच आलेले दोघेजणांना कोरोनाची लागन झाल्याचे रिपोर्ट आले होते. यामुळे माजलगाव तालुका चांगलाच हादरला आहे. त्यानंतर गुरुवारी तालुक्यातील तब्बल १२ रुग्णांचे रिपोर्ट हे पॉझिटीव्ह आल्याने एकाच खळबळ उडाली आहे. यात सुर्डी (न.) येथील एकजण तर, नित्रुड येथील तब्बल ११ रुग्णांचा समावेश आहे. नित्रुड येथील एकाच कुटुंबातील ११ पॉझिटीव्ह हे मुंबईतील तुर्भे उपनगरातून १५ मे रोजी रात्री ११ वाजता एका खाजगी वाहनातून विनापरवाना आलेले होते.
सुरवातीला सर्व नागरिकांना नित्रुड प्रशासनाने जिल्हा परिषद शाळेत क्वारंटाईन करण्यात आले होते; परंतु सरपंचाचे नातेवाईक मुंबईतुन आलेला एक तर सोलापूर येथून आलेल्या दोन जनांना ग्रामपंचायत प्रशासनाने होमक्वारंटाईन करून घरी ठेवल्याची माहिती या ११ लोकांना कळाली. यामुळे त्यांनी ग्रामपंचायत पदाधिकारी, अधिकाऱ्यांशी हुज्जत घालून त्यांना घरी तर, आम्हाला शाळेत का ठेवले ? आम्हालाही घरीच जायचे असे म्हणत ते थेट घरी निघून गेल्याची माहिती नित्रुड येथील नागरिकांनी दिली. त्यानंतर त्यांच्यावर कोणाचाच अंकुश न राहिल्याने ते गावासह इतर गावांच्याही लोकांच्या संपर्कात आल्याचीही माहिती पुढे येत आहे. गुरुवारी त्या ११ जणांचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहेत. जो तो काळजी करू लागला असून आणखी कोण कोण संपर्कात आले याची चर्चा परिसरात होऊ लागली आहे. तालुक्यात आतापर्यंत पॉझिटीव्ह निघालेले १५ जन हे सर्व मुंबईहूनच आलेले होते. यामुळे तालुक्यात मुंबई, पुण्यासारख्या शहरातून आलेल्या नागरिकांवर स्थानिकांच्या नजरा खिळल्या असून त्यांना प्रतिबंध केल्यास स्थानिकांशी हुज्जत घालण्याचे प्रकार घडत आहेत.
गावागावात होऊ लागले राजकीय हेवेदावेआठ दिवसापूर्वी तालुक्यातील ग्रामीण भागात मुंबई, पुणे, औरंगाबाद यासारख्या शहरातून मोठ्याप्रमाणात नागरिकांची आवक झाली आहे. स्थानिक पातळीवरच्या राजकीय हेवेदाव्यामुळे यातील काही जणांना स्वतंत्र क्वारंटाईन कक्षात तर, काहीजणांना थेट घरीच होमक्वारंटाईन करण्याच प्रकार होत आहे. यामुळे सर्वजण घरीच जाण्याची घाई करीत असल्याने रुग्णसंख्या वाढण्याला कारणीभूत ठरत आहे.