बीड : कोरोनावर मात करण्यासाठी रविवारी जनता कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. याला बीड जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. एरव्ही गर्दीने गजबजलेल्या रस्त्यांवर शुकशुकाट दिसून येत आहे. नागरिकांनी घरात राहुन प्रशासनाच्या आवाहनाला पाठिंबा दिला आहे.
बीड शहरात शनिवारी बंद पाळण्यात आला. याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्यानंतर रविवारच्या जनता कर्फ्यूलाही मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला. बीड शहरासह जिल्ह्यातील ११ तालुक्यांमध्ये नागरिकांनी घरात राहणे पसंत केले. अत्यावश्यक सेवा वगळता कोणीही रस्त्यावर दिसले नाही. पोलस प्रशासनाकडून गस्त घातली जात होती. आरोग्य विभागाचे पथके कर्तव्यावर तैनात आहेत. जिल्हा रुग्णालय, ग्रामीण, उपजिल्हा रुग्णालयांसह प्राथमिक आरोग्य केंद्र रुग्णांच्या सेवेसाठी कर्तव्यावर तत्पर असल्याचे दिसत आहे. बीड शहरातील मुख्य बाजारपेठ असलेली सुभाष रोड, भाजी मंडई, जालना रोड, बार्शी रोड, नगर रोड आदी रस्त्यांवर शुकशुकाट दिसून येत आहे.