बीड : बीड शहरातील मसरत नगर भागातील रुग्णांच्या संपर्कातील आणखी दोघे पॉझिटिव्ह आढळले आहेत. आता जिल्ह्याची रुग्णसंख्या ८४ झाली आहे. पैकी ६४ कोरोनामुक्त झाले असून दोघांचा मृत्यू झालेला आहे.
बीड शहरातील मसरत नगर व झमझम कॉलनीतील चौघेजण हैदराबादला गेले होते. परत आल्यावर त्यांची तपासणी केली असता ते सर्वच लोक पॉझिटिव्ह आले. यातील तिघांनी एका लग्न समारंभात हजेरी लावली होती. तसेच काहींनी बँक व इतर शासकीय कार्यालयाचाही दौरा केला होता. त्यामुळे त्यांच्या संपर्कात शेकडो लोक आले. या सर्वांचा शोध घेऊन त्यांचे स्वॅब घेतले जात आहेत. गुरूवारीही मालकाच्या संपर्कात आलेल्या काही कामगारांचे स्वॅब घेतले होते. पैकी लोळदगाव व बाभूळखूंटा येथील दोघे पॉझिटिव्ह आले. हे दोघे मालकाच्या संपर्कात आले होते. ते अगोदरच्या रुग्णाकडे क्रेन चालक म्हणून काम करीत होते. आता मसरत नगरच्या संपर्कातील रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला असून बीडकरांसाठी हा चिंतेचा विषय बनला आहे.