परळी : कोरोना विषाणू जनजागृती संदर्भात तहसिल कार्यालयात 28 मार्च आयोजित करण्यात आलेल्या बैठकीस गैरहजर राहिल्याचा ठपका ठेवून परळी तालुक्यातील दोन तलाठ्यांना उपजिल्हाधिकारी गणेश महाडीक यांनी दि 9 एप्रिल गुरुवारी पुढील आदेश येईपर्यंत निलंबित केले आहे. त्यामध्ये तलाठी मोतीराम जिलेवाड (नागपिंपरी सज्जा ) व सचिन सुधिर एरंडे (गाढेपिंपळगाव सज्जा) या दोघांचा सहभाग आहे .
उपजिल्हाधिकारी गणेश महाडिक यांनी काढलेल्या निलंबन आदेशात म्हटले आहे की, तलाठी सज्जा वर हजर न राहणे, जिल्हाधिकारी बीड यांच्या आदेशाचे पालन न करणे तसेच कोरोना विषाणू संदर्भात प्रतिबंधात्मक उपाय योजना अंमलबजावणीत गांभीर्य नसने व या कामात हलगर्जीपणा करणे या मुद्द्यावरून तलाठी मोतीराम जिलेवाड (नागपिंपरी सज्जा ) व सचिन सुधिर एरंडे (गाढेपिंपळगाव सज्जा) या दोघांना निलंबित करण्यात आले आहे.
तलाठी हे ग्राम दक्षता समितीचे सचिव आहेत. सज्जावर स्वस्त धान्यदुकानदारांना धान्य वाटप करण्यासंदर्भातचा संदेश तलाठ्यांना व्हाट्सअप द्वारे देण्यात आला होता. तहसीलदारांच्या या संदेशा कडे दोघानी दुर्लक्ष केल्याचाही ठपका ठेवण्यात आला आहे .सचिन सुधीर एरंडे यांचे दप्तराचा पंचनामा तात्काळ करण्यात येऊन त्यांच्या तलाठी सज्जा चा अतिरिक्त कारभार कौठळी च्या तलाठी भाग्यश्री बलभीम गीते यांच्याकडे देण्यात आला आहे तर मोतीराम जिलेवाड यांचा नागपिंपरी तलाठी सज्जा चा कार्यभार नागापुरचे तलाठी शेख सलीम शेख अहमद यांच्याकडे देण्यात आला आहे,परळी तहसील कार्यालयात निलंबन काळात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत