परळी : कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी १४ एप्रिल पर्यंत देशभरात लॉक डाऊन केले गेलेले आहे. यामुळे हातावर पोट असणाऱ्या नागरिकांना आपल्या उदर निर्वाहाचा प्रश्न उभा ठाकला आहे. प्रशासन वेगवेगळ्या स्तरावर अशा नागरिकांसाठी प्रयत्न करत आहे. यासाठी देशभरातील देवस्थाने,सामजिक संस्था मदतीचा हात देऊ लागल्या आहेत. श्री वैद्यनाथ देवस्थान ट्रस्टतर्फ़े तालुक्यातील गोसावी समाजातील भटके विमुक्त निराधार कुटूंबियांना साधारण पंधरा दिवस जाईल एवढ्या शिध्याचे वितरण केले जाणार आहे.
बारा ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या परळीच्या श्री वैजनाथ देवस्थान ट्रस्ट तर्फे तालुक्यातील ५०० निराधार कुटूंबाना बंदच्या काळात पुरेल इतका शिधा देण्यात येणार आहे. याची सुरवात आज सिरसाळा येथील शिधा पत्रिका नसलेल्या गोसावी समाजातील भटके विमुक्त निराधार कुटूंबाना वाटप करून करण्यात आली. या मध्ये १० किलो गव्हाचे पीठ,५ किलो तांदूळ,२किलो तुरीची डाळ,१किलो खाद्य तेल,१ किलो मीठ,२०० ग्राम तिखट,५० ग्राम हळद या स्वयंपाकघरात लागणाऱ्या जीवनावश्यक वस्तूचा समावेश असलेल्या एका बॅगेत बंद करून देण्यात आले.
श्री वैजनाथ देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष तथा परळीचे तहसीलदार डॉ.विपीन पाटील, वैजनाथ देवस्थान ट्रस्ट चे सचिव राजेश देशमुख, सिरसाळा पोलीस ठाण्याचे सह्यायक पोलीस निरीक्षक श्रीकांत डोंगरे, किरवले, देवस्थान चे सेवेकरी श्रीपाद कुलकर्णी,बालासाहेब सावंत यांच्या उपस्थितीत सोमवारी दुपारी २ च्या सुमारास या बॅगांचे वाटप सिरसाळा येथे ५१ कुटूंबाना करण्यात आले.