बीड : महिला घरकाम मजूर कल्याणकारी महामंडळ स्थापन करावे, तसेच त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी बिनव्याजी कर्ज, मुलींच्या लग्नासाठी विशेषअनुदान, आरोग्यासाठी विशेष तरतूद करावी आदी मागण्या माैलाना आझाद सेवाभावी संस्थेचे सचिव सय्यद मिनहाजोद्दीन यांनी केल्या आहेत.
परळीत नामांतर दिन
बीड : परळी येथील अशोकनगरात डॉ. बा. आं. मराठवाडा विद्यापीठ नामांतर दिन साजरा झाला. प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. विलास रोडे, ॲड. दिलीप उजगरे, भीमराव डावरे, सहदेव कांबहे, माणिकराव मस्के उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते वही व पेन वाटप करण्यात आले. रहिवाशांची मोठी उपस्थिती होती.
तत्काळ विद्युत दिव्यांची व्यवस्था करावी
धारूर : शहरातील अनेक प्रभागांमधील विद्युत खांबावर दिवे बंदच आहेत. मुयामुळे परिसरातील रहिवासी तसेच येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांना रात्रीच्या वेळी अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे या प्रभागातील सर्व खांबांवर नगरपालिकेने तत्काळ विद्युत दिवे सुरू करावेत, जेथे दुरुस्तीची गरज असेल तेथे दुरुस्ती करून अंधार दूर करण्याची मागणी रहिवाशांमधून होत आहे.
अतिक्रमण विळखा
केज : अंबाजोगाई - मांजरसुंबा या राज्य मार्गावर अतिक्रमणाचा विळखा असल्याने वाहतूक कोंडीचा प्रश्न ऐरणीवर आहे. या दरम्यानच बसस्थानक, शिवाजी चौक व प्रमुख बाजारपेठ असल्याने कोंडी होत आहे. ही कोंडी सोडविण्याची मागणी वाहनधारक, नागरिक करीत आहेत.
वृक्षतोडीकडे दुर्लक्ष
अंबाजोगाई : अंबाजोगाई शहर व परिसरात मोठ्या प्रमाणात वृक्षतोड सुरू आहे. याकडे वनविभागाचे दुर्लक्ष होत आहे. वृक्षाचे संगोपन व संवर्धन हे निसर्गाची धूप थांबवते. वृक्ष निसर्गाचा समतोल राखण्यासाठी वृक्षतोड थांबवावी, अशी मागणी वृक्षमित्र सुधाकर देशमुख यांनी केली.
बसस्थानकात स्वच्छतेची मागणी
पाटोदा : येथील बसस्थानकात आलेल्या प्रवाशांना विविध समस्यांचा त्रास सहन करावा लागत आहे. फलाटावर बस मागे-पुढे होताना खडीचे दगड उडून लागण्याचे प्रकार होतात. यामुळे प्रवासी वैतागून गेले आहेत व जीव मुठीत घेऊन त्यांना चालावे लागते. तसेच स्थानकात स्वच्छतेची मागणी वारंवार करूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. आगारप्रमुखांसह वरिष्ठांनी याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.