लोकमत न्यूज नेटवर्कबीड/धारूर : केज तालुक्यातील धर्माळा येथे शुक्रवारी सायंकाळी एकावर कोयत्याने हल्ला झाला होता. यातील आरोपीला धारूर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांनी प्राथमिक चौकशी केली असता आरोपीने वैयक्तिक वादातून हा प्रकार केल्याचे समोर आले आहे. काही लोकांनी याला राजकीय वळण देण्याचा प्रयत्न केला होता, मात्र पोलिसांच्या तपासामुळे याला पूर्णविराम मिळाला आहे.गणेश मिठू कदम (रा.धर्माळा) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून वैजनाथ सोळंके असे जखमीचे नाव आहे. वैजनाथचा लहान भाऊ नवनाथ व गणेश यांच्यात वाद आहे. गणेशने शुक्रवारी दुपारी मित्रासोबत मद्यपान केले. सायंकाळच्या सुमारास कोयता घेऊन तो नवनाथच्या घराकडे गेला. येथे घराबाहेर उभा असलेल्या दोन दुचाकींची त्याने तोडफोड केली. हा अवाजा ऐकूण वैजनाथ बाहेर आले. त्याच्या हातातील कोयता घेताना त्यांना जखम झाली. तोपर्यंत मोठा जमाव जमला. त्याला नंतर घरी सोडले. तरीही तो पुन्हा घरातून विळा घेऊन आला. याचवेळी इतर काही लोकांनी त्याला पकडले आणि केजला घेऊन गेल्याचे तपासातून समोर आले आहे.दरम्यान, घटनास्थळाच्या बाजूलाच काही अंतरावर एका राजकीय पक्षाची कॉर्नर बैठक सुरू होती. हा गोंधळ ऐकून सर्व जमाव पांगला होता. याचवेळी हा गणेश तेथे गेला आणि खुर्च्याची तोडफोड केल्याचा जबाब काही लोकांनी पोलिसांना दिल्याचे समजते. आरोपीने मद्यपान केले असल्याने त्याच्यावर कोणी विश्वास ठेवायला तयार नाही, हे खरे आहे. मात्र एका पक्षाच्या उमेदवाराच्या पत्नीवर कसलाही हल्ला झालेला नाही. या सर्व घटनेपासून त्या दूर होत्या, असे सोळंके यांनी पोलिसांना सांगितल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. हा प्राथमिक तपास असून अद्याप चौकशी सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले. पोलीस निरीक्षक हेमंत कदम, सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर कुकलारे, सहा.फौ. राठोड, गुंड, चोपणे आदींनी आरोपीला केज तालुक्यातील विडा परिसरात अटक केली.अफवांमुळे त्रासउमेदवाराच्या पत्नीवर कोयत्याने हल्ला झाल्याच्या अफवा वेगाने सोशल मिडीयावरून प्रसारीत झाल्या. त्यामुळे जिल्ह्यात अनेक ठिकाणी कार्यकर्त्यांमधून संताप व्यक्त करण्यात आल्या. परंतु तात्काळ पोलिसांनी हे प्रकरण वैयक्तिक असून यात राजकीय वाद नसल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट केले होते. त्यामुळे याला विराम मिळाला होता. मात्र दरम्यानच्या काळांत पोलीस प्रशासनाला अनंत अडचणींना तोंड द्यावे लागल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
धर्माळा प्रकरण; तो वाद वैयक्तिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2019 12:15 AM