बीड : परळी व अंबाजोगाई तालुक्यातील जलयुक्त शिवार योजनेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी आतापर्यंत ३३ अधिकारी, कर्मचारी व १६७ गुत्तेदार संस्था तसेच सुशिक्षित बेरोजगार यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले होते. या प्रकरणातील अधिकाऱ्यांकडून ५० टक्के व गुत्तेदारांकडून ५० टक्के रक्कम वसूल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हा सर्व गैरव्यवहार काँग्रेसचे नेते वसंत मुंडे यांनी पाठपुरावा करून उघडकीस आणला आहे.
जलयुक्त शिवार ही तत्कालीन शासनाची महत्त्वाकांक्षी योजना होती. त्याचवेळी मोठ्या प्रमाणात सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी परळीसह जिल्हाभरात जलयुक्त शिवार योजनांची कामे केली होती. त्यामध्ये बोगस कामे करून अधिकारी व गुत्तेदारांनी संगनमत करून जवळपास ८ कोटी २८ लाख रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचे आतापर्यंत उघड झाले आहे. वसंत मुंडे यांनी केलेल्या तक्रारीत जलयुक्त शिवार योजनेच्या १३५९ कामांचा उल्लेख होता. त्यापैकी ३४४ कामे तपासली आहेत. वेळोवेळी केलेल्या तपासणीमध्ये कामे निकृष्ट दर्जाची असल्याचे समोर आले आहे, तर अनेक ठिकाणी कामे न करता पैसे उचलल्याचे देखील स्पष्ट झाले आहे.
यासंदर्भात दक्षता पथकाकडून तपासणी केलेले सर्व अहवाल शासनाकडे पाठवण्यात आले आहेत, तर एसआयटी देखील स्थापन करण्यात आली असून, त्यांनी संपूर्ण चौकशी अहवाल आल्यानंतर राज्यात देखील मोठ्या प्रमाणात जलयुक्त शिवार योजनेत भ्रष्टाचार झाल्याचे समोर येणार असल्याचे वसंत मुंडे यांनी सांगितले.
गुन्हे दाखल करण्यास टाळाटाळ
सेवानिवृत्त कृषी सहसंचालक रमेश भताने व भीमराव बाजीराव बांगर, शंकर सखाराम गव्हाणे, दीपक पवार, सुनील जायभाय, कमल लिंबकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश १ एप्रिल रोजी शासनस्तरावरून देण्यात आले होते. मात्र, त्यानंतर राजकीय हस्तक्षेपामुळे गुन्हे दाखल करण्यास प्रशासनाकडून टाळाटाळ केली जात होेती. दरम्यान, तक्रारदार वसंत मुंडे यांनी पुन्हा याचा पाठपुरावा केल्यानंतर १८ मे रोजी परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
फक्त चार जण अटकेत; बाकीचे मोकाटच
जलयुक्त शिवार योजनेत ३३ अधिकारी, कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल झाले होते. त्यापैकी ४ जण स्वत:हून अटक झाले होते. त्यांनी दोन महिने तुरुंगात राहून या कामातील वसुलीचे पैसे शासनाच्या तिजोरीत भरले व त्यानंतर पुन्हा त्यांना सेवेत घेण्यात आले. दरम्यान, यापैकी ३१ अधिकारी, कर्मचारी अद्याप फरार आहेत. पोलीस खातं राजकीय वरदहस्तामुळे अटक करण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप होत आहे.
गुन्हे दाखल झालेल्यांची संख्या
एकूण ३३ अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल
ब्लॅकलिस्टेट केलेल्या मजूर संस्था व सुशिक्षित बेरोजगार अभियंते ३६७
भ्रष्टाचार करण्यासाठी बदलेले अधिकारी
जलयुक्त शिवार योजनेतील बोगस देयके करण्यासाठी तत्कालीन जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी रमेश भताने यांनी अधिकाराचा गैरवापर करत तालुका कृषी अधिकारी उपविभागीय अधिकारी याचे चार्ज वेळोवेळी बदलले. ही सर्व बाब दोन चौकशी अहवालातून समोर आली आहे. त्यानुसार गुन्हे दाखल करण्याची कारवाई करण्यात आली आहे.
जलयुक्त शिवार योजनेतील भ्रष्टाचार फार मोठा आहे. त्यामुळे या पैशाची वसुली अधिकारी व गुत्तेदारांकडून करण्यात येणार आहे. ती लवकरात लवकर करावी. तसेच राज्यात देखील असा भ्रष्टाचार झाल्याचे परळी व अंबाजोगाईतील कामांवरून स्पष्ट होत आहे. पुढे देखील या प्रकरणी पाठपुरावा सुरू राहील. एसआयटीने खरा रिपोर्ट या प्रकरणी शासनाकडे द्यावा म्हणजे सगळं समोर येईल.
वसंत मुंडे, काँग्रेस नेते.
===Photopath===
190521\19_2_bed_14_19052021_14.jpg~190521\19_2_bed_15_19052021_14.jpeg
===Caption===
जलयुक्त शिवार योजना ~वसंत मुंडे काँग्रेस नेते