अंबेजोगाई : इंधन दरवाढीमुळे अत्याधुनिक पद्धतीने शेती मशागत करण्यासाठी मागील वर्षापेक्षा या वर्षी अधिक पैसे मोजावे लागत आहेत. शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नापेक्षा इंधन दरवाढीमुळे मशागतीचा खर्च वाढत आहे. वाढती महागाई व शेतमालास मिळणारा अत्यल्प भाव, यामुळे अगोदरच शेतकरी अडचणीत आहेत. त्यातच दरवर्षी अतिवृष्टी, गारपीट, तर कधी दुष्काळ परिस्थितीमुळे शेती तोट्यात येते. त्यातच मशागतीच्या भाववाढीने शेतकरी पुन्हा संकटात सापडला आहे.
शहरवासीयांचा वाढतोय बेजबाबदारपणा
अंबेजोगाई : अंबेजोगाई तालुक्यात शहरी व ग्रामीण भागात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. कोरोनावर निर्बंध आणण्यासाठी शासनाच्या वतीने विविध उपाययोजना आखल्या जात आहेत. प्रशासन रस्त्यावर उतरून काम करीत आहे. मात्र, कोरोनाच्या नियमांचे पालन न करता, अनेक लोक बिनधास्त फिरत आहेत. याबाबत दक्षता बाळगा. मास्कचा वापर करा. सोशल डिस्टन्सचे पालन करा. घरातच सुरक्षित राहा व प्रशासनास सहकार्य करा, असे आवाहन नगरसेवक संतोष शिनगारे यांनी केले आहे.
पेट्रोल दरवाढीने सामान्यांचे कंबरडे मोडले
अंबेजोगाई : केंद्र सरकारने इंधनावरील नियंत्रण हटविल्याने पेट्रोल व डिझेलचे दर वाढतच गेले. दरवाढ रुपयांनी तर पैशात दर कमी होतात. यामुळे सामान्य माणसाला महागाईचे चटके सहन करावे लागत आहेत.