लोंबकळणाऱ्या तारांमुळे अपघातास निमंत्रण
माजलगाव : तालुक्यातील ग्रामीण भागात अनेकांच्या घरावरून तर काहींच्या घरासमोरून वीजतारा गेल्या आहेत. यामुळे नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. अनेक भागांतील तारा जीर्ण झाल्या असून महावितरणने या तारा बदलण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे. परंतु, अद्यापही याकडे दुर्लक्ष केले जात आहे.
गेवराईत बेशिस्त पार्किंगचा त्रास
गेवराई : शहरातील महामार्गावर विविध शासकीय कार्यालये आहेत. येथे कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांची वाहने रस्त्यावरच बेशिस्तपणे उभी केली जात असल्याने येणाऱ्या-जाणाऱ्या पादचाऱ्यांना अडचण निर्माण होत आहे. वाहनांची कोंडी होत आहे. वाहने पार्किंगसाठी नगर परिषद व पोलीस विभागाने उपाययोजना करून कारवाई करण्याची मागणी वाहनधारक नागरिकांतून केली जात आहे.
पाण्यासाठी नागरिकांची ओरड
बीड : शहरातील हद्दवाढ भागात महिनाभरापासून वेळेवर पाणी येत नाही. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी धावपळ करावी लागत आहे. याबाबत पालिकेकडे वारंवार तक्रारी केलेल्या आहेत. पालिकेने सुरळीत पाणीपुरवठा करण्याची मागणी या भागातील नागरिकांमधून केली जात आहे.
चोऱ्यांचे प्रमाण वाढले
गेवराई : शहरातील हद्दवाढ झालेल्या भागात चोऱ्यांच्या प्रमाणात वाढ झाल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. चोरांचा बंदोबस्त करून शहरात पोलिसांनी गस्त वाढवावी, अशी मागणी नागरिकांमधून जोर धरू लागली आहे. पोलीस ठाण्याचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.