परळी : महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादक पणन महासंघाच्या वतीने तालुक्यात धर्मापुरी येथे एकच कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहे. याठिकाणी कापसाच्या वाहनांच्या रांगा लागत आहेत. गाढेपिंपळगाव, पोहनेर या दूरवरच्या गावातूनही कापूस उत्पादक शेतकरी धर्मापुरीला कापूस आणत आहेत. हे अंतर दूरचे व खर्चिक आहे. गाढेपिंपळगाव येथून धर्मापुरी येथे एक वाहन भरून कापूस घेऊन जाण्यासाठी पाच हजार रुपये भाडे द्यावे लागत आहे. त्यामुळे आणखी कापूस खरेदी केंद्र चालू करणे आवश्यक आहे. सिरसाळा -सोनपेठ रस्त्यावर ३ जिनिंग असून या ठिकाणी पणनचे कापूस खरेदी केंद्र चालू करावे, अशी मागणी होत आहे. यासंदर्भात कापूस पणन महासंघाचे प्रभारी विभागीय व्यवस्थापक सदशिव इंगळे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, पणन महासंघाच्या संचालकांची लवकरच बैठक होणार असून त्यात नवीन कापूस खरेदी केंद्र सुरू करण्याचा निर्णय होणार आहे.
खाजगीपेक्षा जादा भाव
खरेदी केंद्र सुरू झाल्याने धर्मापुरी परिसरातील व तालुक्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांची सोय झाली आहे. खाजगी खरेदीपेक्षा क्विंटलमागे एक हजार रुपयांनी जास्त भाव मिळत असल्याचे परळी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती ॲड. गोविंद फड यांनी सांगितले. कापूस पणन महासंघाचे उपाध्यक्ष विष्णूपंत सोळंके नागापूरकर म्हणाले की, परळी तालुक्यातील शेतकऱ्यांची सोय व्हावी म्हणून लवकरच तीन नवीन कापूस खरेदी केंद्र चालू करण्यात येणार आहेत. त्यादृष्टीने प्रयत्न चालू आहेत. टोकवाडी येथील बंद शेतकरी सहकारी जिनिंग ही येत्या पंधरा दिवसांत सुरू करण्यात येणार आहे.त्यामुळे परळी व परिसरातील शेतकऱ्यांची सोय होणार आहे असल्याचे ते म्हणाले.