....
बियाणे खरेदीसाठी झुंबड
शिरूर कासार : सध्या खरीप हंगाम पेरणीची घाई सर्वत्र सुरू आहे. कृषिसेवा केंद्रावर बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांची झुंबड उडत आहे. कपाशी, तूर, सोयाबीनच्या ठरावीक बियाण्यांची टंचाई जाणवत आहे. पर्याय म्हणून शेतकरी दुकानदारांच्या भरवशावर दुसरा वाण खरेदी करीत असल्याचे दिसून येते.
....
पावसाची प्रतीक्षा
शिरूर कासार : सुरुवातीला पावसाने समाधानकारक हजेरी लावल्याने, शेतशिवार माणसांनी गजबजून गेला आहे. शेती कामात शेतकरी व्यस्त आहे. बी-बियाणे खते आणून ठेवले आहे. असे असले, तरी काही भागांत मात्र पाऊस कमी आहे. तेथील शेतकरी मोठ्या पावसाची अपेक्षा व्यक्त करीत आहेत.
...
बैलापेक्षा शेतात ट्रॅक्टरच जास्त
शिरूर कासार : तालुक्यात सध्या शेती कामाची लगीनघाई सुरू आहे. पाळी, मोघडा, रेघा आणि लावणी पेरणी ही कामे सुरू आहेत. मात्र, सध्या शेतात बैलजोड्यांपेक्षा ट्रॅक्टरचा मोठ्या प्रमाणावर वापर होत असल्याने, शेत शिवारात ट्रॅक्टरची संख्या मोठ्या प्रमाणावर दिसत आहे. शेतीच्या मशागतीसाठी ट्रॅक्टर शेती महागाची झाली असली, तरी बैलापेक्षा ट्रॅक्टरलाच शेतकरी पसंती देत आहेत.