बीड : जिल्हा रुग्णालयातील कार्यालयीन अधीक्षक यांच्या सेवानिवृत्ती लाभातून सव्वातीन लाख रुपये कपात करणे आरोग्य विभागाच्या चांगलेच अंगलट आले आहे. यात न्यायालयाच्या आदेशाने आरोग्य विभागाचे आयुक्त, २ संचालकांसह आठ अधिकाऱ्यांवर मंगळवारी बीड शहर पोलीस ठाण्यात ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकाराने राज्यात खळबळ उडाली आहे.
विठ्ठल शंकरराव लोखंडे हे जिल्हा रुग्णालयात कार्यालयीन अधीक्षक पदावरून ३० एप्रिल २०१३ साली ते निवृत्त झाले होते. त्यांच्या कार्यकाळातील विद्युत देयकाच्या रूपातील ३ लाख २४ हजार रुपये रक्कम भरली नसल्याचे सांगत ती रक्कम त्यांच्या निवृत्तीनंतरच्या लाभातून कपात केली होती. याबाबत त्यांनी आयुक्तांपर्यंत धाव घेतली; परंतु कोणीच दखल घेतली नाही. अखेर त्यांनी वैतागून न्यायालयात धाव घेतली. त्याप्रमाणे बीडच्या न्यायालयाने संचालक, आयुक्तांसह आठ अधिकाऱ्यांवर ३(१)(पी)(क्यू) ॲट्रॉसिटी व भा.दं.वि. १७७, १८२ प्रमाणे गुन्हा नोंद करण्याचे आदेश दिले होते; परंतु सोमवारी लोखंडे व आरोग्य विभाग यांच्यात संगनमत झाले होते. पोलिसांनी दोघांचेही जबाब घेत न्यायालयाला अहवाल दिला. मंगळवारी या प्रकरणात न्यायालयाने पुन्हा गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्याने या आठही अधिकाऱ्यांवर बीड शहर ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.
हे उच्च पदस्थ अधिकारी अडकणार पिंजऱ्यात१४ मे २०१३ ते २३ ऑक्टोबर २०१९ या काळात जेवढे अधिकारी कार्यरत होते, त्या सर्वांवर गुन्हा नोंद झाला आहे. यात लातूरचे उपसंचालक, लातूरचे मुख्य प्रशासकीय अधिकारी डी.एन. मोरे, बीडचे जिल्हा शल्यचिकित्सक, बीडचे मुख्य प्रशासकीय अधिकारी, लातूरचे कार्यालयीन अधीक्षक व्ही.सी. बावसकर, मुंबईचे संचालक, पुण्याचे संचालक, आरोग्य विभागाचे आयुक्त यांचा आरोपींत समावेश आहे.
आता आरोपींचे नाव शोधताना धावपळ१४ मे २०१३ ते २३ ऑक्टोबर २०१९ या काळात गुन्हा दाखल झालेल्या पदांवर किती व कोणते अधिकारी होते, हे शोधताना पोलिसांची धावपळ होणार आहे. हे नावे शोधून त्यांना अटक करेपर्यंत मोठा कालावधी जाणार असून तोपर्यंत आरोपी जामीन करून घेण्याची शक्यता नाकारता येत नाही. या प्रकरणात बडे मासे गळाला लागल्याने आरोग्य विभागाकडून पोलिसांना किती सहकार्य मिळते, हे वेळच ठरवणार आहे.
गुन्हा दाखल केला आहेफिर्यादी व आरोग्य विभागाने सोमवारी लेखी दिलेला जबाब न्यायालयात सादर केला होता. मंगळवारी न्यायालयाने आदेश दिल्याने गुन्हा दाखल केला आहे. आता पुढील कारवाई वरिष्ठांचे आदेश आणि मार्गदर्शनाखाली केली जाईल.-रवी सानप, पोलीस निरीक्षक, शहर पोलीस ठाणे, बीड