बीड : ज्ञानराधा मल्टिस्टेटचे अध्यक्ष सुरेश कुटे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्याचा चौकशी अहवाल सादर करावा, असा आदेश गेवराईच्या प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी गेवराई पोलिस निरीक्षकांना दिला आहे. साडेसोळा लाख रुपयांच्या ठेवी परत दिल्या नाहीत म्हणून न्यायालयात अर्ज दाखल केला होता. यावर हा निर्णय देण्यात आला आहे.
योगेश लक्ष्मीनारायण मुदंडा (रा.सरस्वती कॉलनी, गेवराई) यांनी गेवराई येथील ज्ञानराधा मल्टिस्टेट को-ऑप. क्रेडिट सोसायटीच्या शाखेत १६ मार्च व ६ नोव्हेंबर २०१९ रोजी १६ लाख ५० हजार रुपयांच्या ठेवी शाखाधिकारी यांच्या विश्वासाने ठेवल्या होत्या. मुदत ठेवीवर भरघोस व्याजदर देण्यात येईल, असे मुंदडा यांना सांगितले होते. दरम्यान, घरगुती अडचणीमुळे व उद्योगधंद्यासाठी आवश्यकता भासल्याने योगेश मुंदडा यांनी गेवराई ज्ञानराधा मल्टिस्टेटचे शाखाधिकारी व अध्यक्ष सुरेश ज्ञानोबा कुटे यांच्याकडे मुदत ठेवीची वारंवार मागणी केली. परंतु योगेश यांना विश्वासात घेत मुदत ठेवी आज देतो, उद्या देतो, असे म्हणून आजपर्यंत टाळाटाळ केली. सध्या मल्टिस्टेटची परिस्थिती नाजूक आहे, तुम्हाला ठेवीची रक्कम परत करतो, थोडा दम धरा असे सांगितले.
मात्र, अद्यापपर्यंत पैसे दिले नाहीत. या पैशांसाठी म्हणून दोन वेळा पोस्टाने नोटीस पाठवली होती. तरीही पैसे दिले नाहीत. त्यानंतर योगेश यांना कुटे यांनी पुन्हा बोलावून थोडा धीर धरा असे सांगितले. ठेवी रक्कम परत मागितली असता कुटे यांनी स्पष्टपणे नकार दिला. त्यामुळे योगेश मुंदडा यांनी गेवराई पोलिस ठाणे व आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाकडे तक्रार दाखल केली; परंतु कोणतीही कार्यवाही झाली नाही तसेच ठेवीसुद्धा परत मिळाल्या नाहीत. कुटे यांना राजकीय वरदहस्त असल्याने जाणीवपूर्वक टाळाटाळ करीत असून, पोलिस यंत्रणेवर दबाव आणत असल्याचे तक्रारीत नमूद आहे. त्यानुसार गेवराई न्यायालयाचे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस. पी. वानखेडे यांनी गेवराई पोलिस ठाणे निरीक्षकांना संबंधित तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला आहे. चौकशी पूर्ण झाल्यानंतर त्याचा रिपोर्ट सादर करण्याचेही पोलिसांना आदेशित केले आहे.
राज्यात ५२ शाखाज्ञानराधा मल्टिस्टेटच्या राज्यातील ५२ शाखा बंद आहेत. तसेच सुरेश कुटे यांचा व्यवसायाचा विस्तार परदेशात झाला असल्याने ते केव्हाही परदेशात निघून जाऊ शकतात. त्यामुळे कुटे यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद करावा, अशी मागणी योगेश मुंदडा यांनी गेवराई न्यायालयाकडे अर्जाद्वारे केलेली आहे.
आदेशाप्रमाणे गुन्हा दाखलअद्यापतरी आमच्याकडे न्यायालयाचा आदेश प्राप्त झालेला नाही. परंतु तक्रारदार भेटून गेले आहेत. तक्रारदार हे तक्रार मागे घेणार, असे सांगत आहेत. यासाठी दोन दिवसांचा वेळही असतो. दोन दिवसांनंतर आदेशाप्रमाणे गुन्हा दाखल केला जाईल.- प्रवीणकुमार बांगर, पोलिस निरीक्षक, गेवराई