अनिल महाजन
धारुर : महाविद्यालयीन शिक्षण घेतलेल्या पुतणीला लग्नानंतर सासरी शेण काढण्यास लावले. सततच्या शेण काढण्यावरुन होणाऱ्या कुरबूरीमुळे सुखाचा संसार मोडला. ही वेळ इतर कोणाही मुलीवर येऊ नये, यासाठी संसार मोडलेल्या पुतणीच्या चुलत्याने चक्क शेण काढण्याचेच यंत्र पाच वर्षांच्या अथक परिश्रमातुन तयार केले आहे. हे यंत्र धारुर पंचक्रोशीत चर्चेचा आणि कौतुकाचा विषय बनले आहे.
धारूर तालुक्यातील चिंचपूर गावातील मोहन लांब हे प्रयोगशील शेतकरी म्हणून ओळखले जातात. सतत काहीना काही नविन करण्याचा प्रयत्न त्यांचा असतो. त्याची बीए पदवीधर असलेल्या पुतणीचा विवाह काही वर्षांपूर्वी शेतकरी कुटुंबातील एका युवकाशी झाला होता. पुतणीला नोकरी करण्याची इच्छा असताना सासरकडील मंडळींनी तीला घरकाम आणि शेतातील काम करण्यास लावले. त्या कुटुंबात दुग्धव्यवसाय असल्यामुळे जनावरांचे शेण काढण्याची जबाबदारीही नवविवाहितेवरच सोपविली. शेण काढण्याच्या कारणावरुन जाणीवपूर्वक त्रास देण्यात येऊ लागला. यातुन कुटुंबात वाद वाढत गेले. या वादाचे रुपांतर संसार मोडण्यात झाले.
या घटनेमुळे धक्का बसलेले मोहन लांब हे शेण काढण्यावर पर्याय शोधत होते. तेव्हापासून त्यांनी विविध प्रयोग करण्यास सुरुवात केली. यातुन शेण काढण्याचे यंत्र तयार झाले आहे.सतत पाच वर्ष त्यावर मेहनत घेतली असल्याचेही त्यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.
चौकट,
असे बनविले यंत्र
जनावरांच्या गोट्यातील शेण काढण्यासाठी यंत्र बनविण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार त्याचे प्रारुप मॉडेल तयार केले. त्यासाठी लागणाऱ्या अनेक वस्तू पुण्याहुन मागविल्या. यात जीआय, स्टील, मोटार बॅटरी, चॅर्जर, बॉडीसाठी लागणारे स्टील, चाके आदींचा समावेश आहे. या सर्व वस्तूंच्या माध्यमातुन हे यंत्र बनविण्यात आले आहे. हे यंत्र एकाच वेळी दहा व्यक्तींचे काम करु शकते. तसेच जनावरांचा गोठा स्वच्छ ठेवण्यासाठी मदतगार ठरणार असल्याचा दावाही मोहन लांब यांनी केला आहे.
चौकट,
एका यंत्राला मिळाले पेटंट
मोहन लांब हे सतत काहीही ना काही शेती कामातील औजारे बनविण्याचा प्रयत्न करत असतात. २०१० मध्ये त्यांनी शेतातील कापसाची फवारणी करण्यासाठी स्प्रे पंपची निर्मिती केली होती. हा स्प्रे पंप अतिशय उत्कृष्ट ठरला होता. हातानेच फवारता येत होते. या यंत्राची पेटंटसाठी नॅशनल इनोव्हेशन फाऊंडेशनने मुंबईतील कार्यालयाकडे नोंदणी केली होती. त्यास पेटंट बहाल करण्यात आले असल्याचेही मोहन लांब यांनी सांगितले. याशिवाय त्यांनी शेतात खुरपणी करण्यासाठी हात खुरपीही बनविली आहेत. सध्या कापसाची पळाटी उपटून आपोआप गोळा होईल, अशा पद्धतीचे शेती यंत्र बनविण्याचा प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.
फोटो कॅप्शन : १) धारुर तालुक्यातील चिंचपूर येथील प्रयोगशील शेतकरी मोहन लांब यांनी शेण काढण्यासाठी बनविलेले यंत्र.
२) शेण काढण्यासाठी बनविलेल्या यंत्रासोबत प्रयोगशील शेतकरी मोहन लांब.
===Photopath===
210221\img-20210221-wa0134_14.jpg~210221\img-20210221-wa0130_14.jpg