पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या सूचनेनंतर जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सूर्यकांत गित्ते व यंत्रणेने आवश्यक उपचार सामग्री व सुविधेच्या बाबी दोन दिवसांत उपलब्ध करून सेंटरची उभारणी केली. परळी उपजिल्हा रुग्णालयात सौम्य ते मध्यम तीव्रतेच्या कोरोनाबाधित रुग्णांचे उपचार करता यावेत, यासाठी ही सुविधा करण्यात आली. दरम्यान, या ५० बेडच्या व्यवस्थापनेसाठी आवश्यक असलेल्या ऑक्सिजनची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. यापैकी २० बेड शुक्रवारी, तर उर्वरित ३० बेड येत्या दोन दिवसांत रुग्णांसाठी उपलब्ध होतील. शिवाय रुग्णालयात दाखल होणाऱ्या नियमित रुग्णांच्या उपचारांवर कोणताही परिणाम होणार नाही, अशी माहिती परळी उपजिल्हा वैद्यकीय अधीक्षक डॉ. अर्शद शेख यांनी दिली आहे.
परळीत सध्या समाजकल्याण विभागाच्या दोन वसतिगृहांमध्ये मिळून सौम्य व लक्षणे नसलेल्या २०० पेशंटची सोय करण्यात आली आहे. याशिवाय शहरातील सात डॉक्टरांनी आपल्या खाजगी रुग्णालयात कोरोना पेशंटवर उपचार सुरू केले आहेत. पालकमंत्री मुंडे यांनी शहरातील डॉक्टरांशी नियमित संवाद ठेवून या संकटात जास्तीत जास्त सेवा द्यावी, असे आवाहन केले.