धारूर : कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर परवानाधारक रिक्षाचालकांना आर्थिक साहाय्यता देण्याबाबत कार्यप्रणाली विकसित करण्यात आली असून, अर्ज सादर करताना प्रणालीबाबत अडचण आल्यास अंबाजोगाई उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाशी संपर्क साधावा. परवानाधारक रिक्षाचालकांनी परिवहन विभागाच्या संबंधित संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी दत्तात्रय संगोलकर यांनी केले आहे. परवानाधारक रिक्षाचालकांना आर्थिक साहाय्य म्हणून १५०० रुपये देण्याबाबत ७ मे रोजीच्या शासन निर्णयानुसार जाहीर केले आहे. हा लाभ पात्र लाभार्थ्यांना बँक खात्यात थेटपणे देण्यासाठी कार्यप्रणाली सुरू केली आहे.
यानुसार परवानाधारक रिक्षाचालकांनी संकेतस्थळावर अर्ज सादर करावा. या ऑनलाईन प्रणालीमध्ये कोणाचाही बँक खाते क्रमांक विचारला जाणार नाही याची नोंद घ्यावी, असे उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी कळविले आहे.
कागदपत्रे नाहीत, फक्त नोंद करावी लागणार
रिक्षाचालकांना कोणतीही कागदपत्रे न सादर करता केवळ ऑनलाईन प्रणालीवर त्यांना वाहन क्रमांक, वाहन परवाना व आधार क्रमांक नोंद करावा लागणार आहे. ही माहिती संगणक प्रणालीवर प्रमाणित करण्यात येईल. त्यानंतर ज्यांचे आधार क्रमांक बँक खात्याशी जुळतील, त्यांचा तत्काळ लाभ संबंधित खात्यावर जमा होणार आहे.