: कोरेगाव येथील घटना
लोकमत न्यूज नेटवर्क
केज : तालुक्यातील कोरेगाव येथे सामाईक पाईपलाईन फोडल्याच्या वादातून तिघांनी झोपेत असलेल्या एकावर कोयत्याने हल्ला करून जीवे मारण्याचा प्रयत्न करून गंभीर दुखापत केल्याची घटना घडली. याप्रकरणी केज पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोरेगाव येथील धनराज युवराज तांदळे व अविनाश विठ्ठल तांदळे हे दोघे सख्खे चुलतभाऊ असून, त्यांची शेजारी जमीन आहे. दोघात सामाईक पाईपलाईन केलेली आहे. गेल्या सहा ते सात महिन्यांपासून अविनाश तांदळे हा सामाईक पाईपलाईनमधून पाणी घेऊ देत नसल्याने धनराज युवराज तांदळे याने ती पाईपलाईन १८ मे रोजी सकाळी दहाच्या सुमारास फोडली. त्याचा राग मनात धरून २० मे रोजी धनराज तांदळेसह त्याचा भाऊ राम तांदळे व आतेभाऊ जगन्नाथ तोंडे हे घरासमोर झोपलेले असताना रात्री सव्वाबाराच्या सुमारास अशोक विठ्ठल नेहरकर याने धनराज युवराज तांदळे याच्या डोक्यात कोयत्याने वार केला. यात धनराज याच्या डोक्याच्या उजव्या बाजूला व डाव्या हाताला गंभीर दुखापत झाली. याप्रकरणी धनराज युवराज तांदळे यांच्या फिर्यादीवरून केज पोलीस ठाण्यात अशोक विठ्ठल नेहरकर (रा. पिसेगाव, ता. केज), अविनाश बाबासाहेब तांदळे (रा. कोरेगाव, ता. केज) आणि बप्पा शामराव तोंडे (रा. सोनिमोहा, ता. धारूर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.