परळी : तालुक्यातील माकपचे माजी खासदार स्व. कॉम्रेड गंगाधरअप्पा बुरांडे , कॉम्रेड बापूसाहेब देशमुख यांचे गाव असलेल्या मोहा येथे माकप पुरस्कृत पॅनलचे आजपर्यंत वर्चस्व होते. या निवडणुकीत मात्र गाव पातळीवर राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन माकप पुरस्कृत पॅनलविरुद्ध लढा देत ग्रामपंचायत ताब्यात मिळविली. राष्ट्रवादी काँग्रेस- भाजप पुरस्कृत पॅनलचे सात उमेदवार विजयी झाले आहेत. ग्रामपंचायतीच्या स्थापनेपासून केवळ दोन टर्म विरोधी पॅनलकडे ग्रामपंचायत होती. हे दोन टर्म वगळता आजपर्यंत माकपचे वर्चस्व मोहा ग्रामपंचायतीवर होते. या निवडणुकीत मात्र माकपच्या ताब्यातून ग्रामपंचायत निसटली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस -भाजपा पुरस्कृत लोकसेवा पॅनलविरुद्ध माकप पुरस्कृत ग्रामविकास पॅनलमध्ये लढत झाली. यात मोहा येथील विष्णूपंत सोळंके व नवनाथ देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली लोकसेवा पॅनलने बाजी मारली व ११ पैकी सात जागांवर विजय मिळविला. ग्रामविकास पॅनलला चार जागांवर समाधान मानावे लागले.
माकपचा गड गेला पण
माजी खासदार गंगाधर आप्पा बुरांडे यांचे पुत्र अजय बुरांडे यांच्यासह त्यांचे चार उमेदवार निवडून आले आहेत. गड गेला पण सिंह आला असेच झाले आहे. मागच्यावेळी काॅ. अजय बुरांडे यांच्या सरपंचपदाच्या काळात मोहा परिसरात जलसाक्षरता मोठ्या प्रमाणात करण्यात आली होती तसेच सिंचनाची कामे ग्रामस्थांच्या श्रमदानातून करण्यात आली होती.