सध्या सुट्यांचे दिवस असल्याने प्रत्येकाला पैशाची गरज आहे. अनेकजण पैसे काढण्यासाठी एटीएममध्ये जातात; परंतु त्यात पैसे नसल्याने त्यांना बँकेत जावे लागते. बँकेत रांगेत उभे राहून दोन-तीन तासांनंतर नंबर लागल्यानंतर बँकेचे कर्मचारी एटीएममधून पैसे काढण्याचा सल्ला देतात. बँक जोपर्यंत उघडत नाही. तोपर्यंत एटीएममध्ये पैसे नसतात. याच कारणाने नागरिकांना बँक उघडण्याची वाट पाहत ताटकळत बसावे लागत आहे. एटीएममधून पैसे मिळत नसल्याने आणि बँकेत रांगेत उभे राहून पैसे काढावे लागत असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
एटीएममध्ये पैसे शोधण्यासाठी नागरिकांना या एटीएममधून त्या एटीएममकडे पळावे लागत आहे. शहरातील सर्व एटीएममध्ये जाऊन पैसे मिळत नसल्याने नागरिकांची निराशा होत असून लग्नसराईत पैशाअभावी कामे खोळंबत आहेत.
यासाठी बँक प्रशासनाने एटीएममध्ये पैशाची व्यवस्था करून शहरातील नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे.
कर्मचारी असतात मोबाइलवर व्यस्त
पैसे काढण्यासाठी बँकेत गेल्यानंतर ग्राहकांना अनेक वेळ ताटकळत बसावे लागते. कर्मचारी समोरील काम करण्याचे सोडून मोबाइलवर बोलत बसतात. तसेच कामाचा बहाणा करून उठून जातात व अर्धा तास तिकडेच बसतात. बँक कर्मचाऱ्यांवर कोणाचाही अंकुश नसल्याने नागरिकांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. लोकांना कित्येक तास ताटकळत बसावे लागते. बँकेत काम सुरू असताना मोबाइलवर बोलणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते शैलेश कांबळे यांनी केली.