बीड : ‘तुमचे क्रेडिट कार्ड बंद झालेले आहे ते सुरू करून देतो’ असे सांगून क्रेडिट कार्डच्या संदर्भातील माहिती विचारून घेत रक्कम काढून घेण्यात आली. ही घटना पाटोदा तालुक्यातील पाचंग्री येथे घडली. याप्रकरणी पाटोदा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.
पाचंग्री येथील रहिवासी अभिजीत अर्जन मुंडे यांना त्यांच्या मोबाईलवरून संपर्क साधला. त्यावेळी तुमचे क्रेडिट कार्ड बंद पडलेले आहे. ते सुरु करण्यासाठी विचारलेली माहिती सांगावी. त्यानंतर मुंडे यांनी सर्व माहिती सांगितली. माहिती दिल्यानंतर काही वेळात त्यांच्या क्रेडिट कार्डमधून २६ हजार ४२९ रुपये काढून घेतले. आपली फसवणूक झाल्याचे अभिजीत यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी संबंधित बॅंकेत संपर्क करून क्रेडिट कार्डच्या माध्यमातून फसवणूक झाल्याचे सांगितले. दरम्यान ,याप्रकरणी पाटोदा पोलीस ठाण्यात फसवणूक झाल्याप्रकरणी ११ एप्रिल रोजी तक्रार देण्यात आली. पोलीस अधिकाऱ्यांनी बँकेशी संपर्क करून संपूर्ण माहिती घेतली. त्यानंतर संबंधित मोबाईल क्रमांकावरून पाटोदा पोलीस ठाण्यात १९ एप्रिल रोजी उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फोनवरून माहिती देणे टाळा
ऑनलाईन व्यवहार सुरु मोठ्या प्रमाणात केले जातात. मागील वर्षभरापासून ऑनलाईन पद्धतीने फसवणूक करण्याचे प्रकार वाढले आहेत. कोणतीही बँक फोनद्वारे माहिती मागत नाही. त्यामुळे फोनवरून बँक खात्याशी संबंधित माहिती देऊ नये. माहिती दिल्यानंतर फसवणूक केली जाते. त्यामुळे नागरिकांंना सतर्क राहून फोनवर माहिती देऊ नये, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून केले आहे.