बीड : पाटोदा तालुक्यातील डोंगरकिन्ही येथील बसस्थानकाच्या जवळ असलेल्या मोक्याच्या प्लॉटचा ताबा घेण्यासाठी जीपमधून आणलेल्या गुंडांनी गोळीबार करुन एका कुटुंबावर हल्ला केल्याची घटना बुधवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास घडली होती. प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी अंमळनेर पोलीस ठाण्यात ४० ते ५० अज्ञातांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर, घटना घडल्यानंतर दोन संशयितांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून इतरांची माहिती घेण्याचे काम सुरु आहे.
डोंगरकिन्ही येथील कल्याण सयाजी येवले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बुधवारी ते बसस्थानक परिसरातील एका हॉटेलमध्ये थांबलेले होते. यावेळी मारूती येवले, मुकुंदा येवले, विठ्ठल येवले, अण्णा येवले, जिजाबा येवले, गुजाबा येवले (सर्व रा.डोंगरकिन्ही) यांच्यासह विना क्रमांकाच्या जीपमधील ४० ते ५० जण त्याठिकाणी आले. त्यांच्यासोबत जेसीबी मशीन देखील होती. यावेळी ‘ही जागा ५ मिनिटात रिकामी करा’ अशी धमकी देत शिवीगाळ करुन दोघांनी कल्याण येवले यांच्या दिशेने दगडफेक केली. इतरांनी लाकडी दांड्याने मारहाण केली. याच दरम्यान एकाने जिवे मारण्याच्या हेतूने कल्याण येवले यांच्या दिशेने गोळीबार केला. गोळीचा आवाज ऐकून गावातील लोकांनी गर्दी केली होती. त्यानंतर चारचाकीमधून आलेले सगळे जण फरार झाले. या प्रकरणी संबंधितांवर अंमळनेर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी काही संशयितांना रात्रीच ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून इतरांची माहिती घेण्याचे काम सुरु आहे. याप्रकरणाचा तपास सहाय्यक निरीक्षक डोंगरे करत आहेत.
जागेची किंमत वाढल्याने वाद
डोंगरकिन्ही बसस्थानकाजवळ जिल्हा परिषद माध्यमिक शाळा आहे. या शाळेसाठी जमीन देण्यात आलेली होती. त्याठिकाणी शाळेचे बांधकाम देखील काही वर्षापूर्वी झाले आहे. मात्र, शाळेच्या बाजूला मोकळी जागा आहे. याच ठिकाणावरून पैठण -पंढरपूर हा राष्ट्रीय महामार्ग गेला आहे. त्यामुळे या प्लॉटचे भाव वाढले आहेत. याच्या मालकी हक्कावरून मागील काही वर्षापासून येवलेंच्या दोन गटात वाद सुरु आहे. हे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे मात्र, तरी देखील एका गटातील व्यक्तीने या जागेचा सौदा केला असल्याची माहिती आहे. या प्लॉटचा ताबा घेण्यावरून दोन गटात धुसफूस नेहमीच सुरु असते. मात्र, बुधवारी थेट गोळीबार झाल्याने डोंगरकिन्हीत खळबळ उडाली होती. याप्रकरणाची पोलिसांनी गंभीर दखल घेतली असून, सर्व आरोपींना अटक करण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न केले जात आहेत.