बीड : संयुक्त बँक खात्यावरील रक्कम उस्मानाबाद बँकेचे मॅनेजर बालाजी देशमुख व मनसे जिल्हाध्यक्ष वैभव चंद्रकांत काकडे यांनी परस्पर काढली. याप्रकरणी ‘त्या’ दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्याचा आदेश न्या. चिं. पू. शेळके यांनी दिला होता. त्यानुसार गुन्हा दाखल केला असून, पुढील सुनावणी १६ एप्रिल रोजी होणार आहे.
अशोक किसनराव सुरवसे व वैभव चंद्रकांत काकडे हे दोघेही मनसेचे जिल्हा पदाधिकारी आहेत. त्यांनी स्पॅन आयडिया कन्सेप्ट प्रा. लि. नावाची कंपनी संयुक्तरित्या स्थापन केली होती. या फर्मचे संयुक्त बँक खाते हे बीड येथील उस्मानाबाद जनता सहकारी बँकेत उघडण्यात आले होते. त्या खात्यावरील व्यवहार सुरवसे व काकडे या दोघांमार्फत संयुक्तरित्या होण्याबाबत कायदेशीर कारवाई पूर्ण करण्यात आली होती.या कंपनीची तशी अट असतानाही वैभव चंद्रकांत काकडे यांनी उस्मानाबाद बँकेचे मॅनेजर बालाजी देशमुख यांच्याशी संगनमत करून परस्पर एकट्याने या फर्मच्या खात्यावरील तीन लाख रुपये काढले. काही दिवसानंतर फिर्यादी अशोक सुरवसे यांच्या निदर्शनाला ही बाब आल्यानंतर त्यांनी बँक मॅनेजर देशमुख यांच्याशी संपर्क केला असता, त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. पर्याय नसल्याने अशोक सुरवसे यांनी न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने सर्व बाजू तपासून बँक मॅनेजर बालाजी देशमुख व मनसेचे जिल्हाध्यक्ष वैभव काकडे यांच्याविरोधात कलम ४२०, ४१९ यासह इतर कलमान्वये गुन्हा दाखल करण्याचे आदेश ११ मार्च रोजी दिले होते. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गैरसमजुतीतून तक्रार हा कंपनीचा व्यवहार असून, त्यात अपहार झालेला नाही. तक्रारदाराने गैरसमजुतीतून तक्रार दिली असावी. याला राजकीय वळण देणे चुकीचे होईल.- वैभव काकडे, मनसे जिल्हाध्यक्ष, बीड.