बीड : अवैध धंद्यांविरुध्द गुन्हे शाखेने मोहीम उघडली असून, ८ जानेवारी रोजी तलवाडा हद्दीतील भेंडटाकळी तर पाटोदा तालुक्यातील पाटसरा येथे जुगार अड्ड्यांवर धाडी टाकून १६ जणांना अटक करण्यात आली. यावेळी १२ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
भेंडटाकळी येथे शिवाजी विठ्ठल उबाळे हा स्वत:च्या मालकीच्या पत्र्याच्या शेडमध्ये जुगारअड्डा चालवित असल्याची माहिती मिळाल्यावरून गुन्हे शाखेचे निरीक्षक सतीश वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक संतोष जोंधळे व सहकाऱ्यांनी तेथे ८ रोजी छापा टाकला. यावेळी शिवाजी उबाळेसह गणेश चव्हाण (रा. गोपतपिंपळगाव), हनुमान सोळंके (रा. सुर्डी), बाळू राठोड (रा. मारफळा), जिजा तौर (रा. बाबुलतारा), राम कदम (रा. सिरसदेवी), सारंग कादे (रा. खेर्डावाडी), अर्जुन उबाळे (रा. भेंडटाकळी), चरणदास काळे (रा.उमरद पारगाव ता.बीड) या
९ जणांना रंगेहाथ पकडण्यात आले. त्यांच्याकडून रोख रक्कम, जुगार साहित्य व एक जीप असा १२ लाख १० हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी उपनिरीक्षक संतोष जोंधळे यांच्या तक्रारीवरून तलवाडा ठाण्यात गुन्हा नोंद झाला. दरम्यान, दुसरी कारवाई अंमळनेर ठाणे हद्दीतील पाटसरा येथे सहायक निरीक्षक ज्ञानेश्वर कुकलारे व सहकाऱ्यांनी ८ रोजी सायंकाळी साडेसात वाजता केली. यावेळी ७ जणांना रंगेहाथ पकडून ६ हजार ४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
अंमळनेर, तलवाडा पोलिसांचे दुर्लक्ष कसे?गुन्हे शाखेचे अधिकारी-अंमलदार ठाण्यांच्या हद्दीत जाऊन अवैध धंद्यांवर कारवाया करत आहेत. त्यामुळे ठाणेप्रमुखांचा नाकर्तेपणा समोर येऊ लागला आहे. अंमळनेर ठाण्याचे सहायक निरीक्षक गोरक्ष पालवे व तलवाडा ठाण्याचे प्रताप नवघरे हे कर्तव्यदक्षपणाचा आव आणतात; पण गुन्हे शाखेच्या पथकांनी टाकलेल्या धाडीनंतर अवैध धंदे कसे बिनबोभाट सुरू आहेत, हे उघडकीस आले. आता दोन्ही ठाणेप्रमुखांना वरिष्ठांकडून विचारणा होण्याची शक्यता आहे.