बीड : न विचारता माहेरी का आलीस, असे कारण काढून सासुरवाडीत येऊन चाकूने भोसकून पत्नीची हत्या केल्याची घटना दोन वर्षांपूर्वी बोरखेड (ता. बीड) येथे घडली होती. या प्रकरणात अपर सत्र न्या. सुरेखा पाटील यांनी आरोपी पतीला दोषी ठरवून जन्मठेप व दहा हजार रुपये दंडाची शिक्षा ३० जानेवारी रोजी ठोठावली.शहाजी शहात्तर काळे (३२,रा. हंगेवाडी, जि. उस्मानाबाद) असे आरोपीचे नाव आहे. पत्नी नगिना (२५) हिच्या हत्येचा त्याच्यावर आरोप होता. नगिना हिचे माहेर बोरखेड (ता. बीड) आहे. पतीशी भांडण झाल्याने नगिना ही ८ ऑक्टोबर २०२० रोजी माहेरी निघून आली होती. त्यानंतर १० ऑक्टोबर २०२० रोजी शहाजी हा सासुरवाडीत गेला आणि त्याने चाकूने नगिनावर सपासप वार केले. नगिनाच्या आईच्या फिर्यादीवरून नेकनूर ठाण्यात पती शहाजी काळेविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंद झाला. तत्कालीन सहायक निरीक्षक लक्ष्मण केंद्रे व उपनिरीक्षक किशोर काळे यांनी तपास करून मुदतीत दोषारोपपत्र दाखल केले. सरकारी वकील अनिल धसे यांचा युक्तिवाद, साक्षीपुरावे ग्राह्य धरून न्या. सुरेखा पाटील यांनी आरोपी शहाजी काळेला दोषी ठरवून दहा हजार दंड व जन्मठेपेची शिक्षा ठोठावली.
Crime News: न विचारता माहेरी गेल्याने पत्नीचा खून; पतीस जन्मठेप
By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2023 8:23 AM