बीड : ज्या हातांनी गर्दीच्या ठिकाणी महिलांची पर्स, पुरूषांचे पॉकेट, गळ्यातील दागिने लंपास केले. त्याच हातांनी बुधवारी पोलिसांना भाऊराया मानत राखी बांधली. हा बदल केवळ पोलिसांनी केलेल्या प्रबोधनामुळे झाला झाले. पारधी समाजातील या महिला आज सर्वसामान्यासारखे जीवन जगत असल्याचे सांगण्यात आले.
साधारण दुपारी एक वाजण्याची वेळ. पोलीस अधीक्षक कार्यालयात ५ ते ७ महिला मुला बाळांसह दाखल झाल्या. कुठल्या तरी वस्तीवरील त्या असाव्यात, त्यांची काही तरी तक्रार असेल असे वाटत होते. परंतु त्या स्वागत कक्षाजवळ न थांबता थेट स्थानिक गुन्हे शाखेत गेल्या. येथील सर्वांनी या महिलांना ओळखले. काही महिला कर्मचारी त्यांच्या दिशेने धावल्या. परंतु इतर कर्मचाऱ्यांनी त्यांना अडविले. आता आम्ही गुन्हेगार नाहीत.
आम्ही सर्व सोडून दिले आहे. मेहनत करून जीवन जगतो. आमचे पती गुन्हेगार असतील, तर त्यांना शिक्षा द्या. परंतु मागील अनेक महिन्यांपासून आम्ही बदललो आहोत. आमची एकच विनंती आहे, की ज्या पोलिसांनी आमचे प्रबोधन करून आम्हाला बदलले, अशा पोलीस अधिकारी आणि कर्मचाºयांना राखी बांधायची आहे. हे ऐकून काहीवेळ सगळेच थक्क झाले. परंतु खात्री केली असता या महिला पूर्वी गुन्हेगार होत्या. परंतु मागील अनेक महिन्यांपासून त्यांच्यावर कसलीच कारवाई झाली नसल्याचे सांगण्यात आले.
पोलिसांनी कसलाही गर्व न बाळगता आलेल्या महिलांकडून राखी बांधून घेतली. यापुढे गुन्हेगारी करू नका, अन्याय झाल्यास आमच्याकडे आम्ही संरक्षण देऊ, अशी अश्वासन देत रक्षाबंधणाची एकप्रकारे ओवाळणीच दिली. छोट्याशा परंतु बदललेल्या कार्यक्रमामुळे वातावरण कौटुंबिक झाले होते. यावेळी गुन्हे शाखेचे सपोनि दिलीप तेजनकर, बालाजी दराडे, गणेश हंगे, बाबासाहेब डोंगरे, रविंद्र गोले उपिस्थत होते.कोण आहेत या महिला?रेखाबाई काकासाहेब चव्हाण, इंदुबाई विश्वास चव्हाण, वंदना नसीन चव्हाण यांच्यासह ५ ते ७ महिला होत्या. यातील काकासाहेब हा दरोडेखोर आहे. तर विश्वास चव्हाण हा अट्टल गुन्हेगार आहे. त्यांच्या या पत्नी आहेत. गुन्हेगारी केल्यावर खुप त्रास होतो. परंतु पोलिसांनी आपल्याला याबाबत प्रबोधन केले. आता पुन्हा त्या मार्गाला जाणार नाहीत. मेहनत करून पोट भरत आहोत, असे रेखाबाई चव्हाण यांनी सांगितले.