शिरुरकासार (जि. बीड) : शहरातील सिद्धेश्वर संस्थानच्या मंगल कार्यालयात गुरुवारी पार पडलेल्या ऊसतोड मजूर मुकादमांच्या बैठकीत जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी भाजपाचे आमदार सुरेश धस यांच्यासह साठ जणांविरुद्ध पोलीस स्टेशनला शुक्रवारी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पोलीस नाईक मारुती केदार यांच्या फिर्यादीवरून सदरील गुन्हा दाखल झाला आहे. गुरुवारी दुपारी दीड ते अडीचदरम्यान सिद्धेश्वर संस्थानच्या मंगल कार्यालयात ऊसतोड कामगार मुकादमांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी जिल्हाधिकारी यांच्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन तसेच शहरात कोविड आजाराचे रु ग्ण वाढत असल्याचे माहीत असतानादेखील सार्वजनीक सुरक्षा व धोका निर्माण करण्याचा प्रयत्न केला म्हणून आमदार सुरेश धस यांच्यासह पुत्र जयदत्त धस, गणेश भांडेकर, अरुण भालेराव, प्रकाश बडे, शिवाजी पवार, बाबुराव केदार, दशरथ वणवे, प्रकाश देसारडा, रामदास हंगे, सुरेश उगलमुगले, कल्याण तांबे, अजय कुचेरिया, रामदास बडे, अनवर शेख, ज्ञानेश्वर उटे यांच्यासह इतर पन्नास ते साठ अनोळखी लोकांवर कलम १८८, २६९, २७0 आपत्ती व्यवस्थापन कायदा २00५ (ब) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मनोज बरुरे हे करत आहेत.