बीड : येथील नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात पुकारलेल्या बंदवेळी दगडफेक झाली होती. मात्र पुतळ््याची विटंबना झाल्याबाबत खोटी अफवा सोशल मीडियावर पसरविल्याप्रकरणी पिंपळनेर, माजलगाव, धारूर, सिरसाळा, नेकनूर पोलीस ठाण्यांमध्ये ९ जणांविरुद्ध ६ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
शुक्रवारी बीड बंददरम्यान दगडफेकीच्या घटना घडल्या होत्या. त्यानंतर सोशल मीडियावर काही मजकूर व्हायरल करून अफवा पसरविल्याचे निदर्शनास आल्याने पोलिसांनी ही कारवाई केली आहे. गेवराई येथे संतोष ऊर्फ पप्पू भोसले, सचिन दाभाडे, रवी काळे, अमोल पौळ, माजलगाव येथे सतीश बोठे, सिरसाळा येथे बाळासाहेब पाथरकर, पिंपळनेर येथे दीपक घाटे, नेकनूर येथे सागर शिंदे, धारूर येथे सचिन साकराते यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल झाले आहेत. समाजात तेढ निर्माण करणारा मजकूर तयार करून नंतर तो व्हायरल करून द्वेषभाव निर्माण करण्याचे कृत्य केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे.