परळी (बीड) : कोविड असेल किंवा अतिवृष्टी मागील दोन वर्षांच्या काळात सर्वसामान्य माणसाने अनेक संकटांना तोंड दिलेच पण अगदी देवळाची दारे सुद्धा बंद राहिली, देवळांची दारे पुन्हा बंद होतील, या स्वरूपाचे कोणतेही संकट आता राज्यावर येऊ नये, असे साकडे बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी प्रभू वैद्यनाथास घातले आहे.
आज महाशिवरात्री निमित्त पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी सहकुटुंब प्रभू वैद्यनाथाचे दर्शन घेतले. त्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते. मागील दोन वर्षांच्या काळात कोविड विषयक निबंधांमुळे सार्वजनिक यात्रा सारख्या कार्यक्रमांना बंदी होती, यावर्षी मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आले आहे व पारंपरिक शिवरात्री उत्सव संपन्न होतो आहे. पुढील वर्षी नेहमी प्रमाणे भव्य यात्रा भरेल व या यात्रेच्या लौकिकाची सर्व माध्यमे स्वतःहून दखल घेतील असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला.
शिवभक्तांना फराळ वाटलादरवर्षीप्रमाणे नगर परिषदेच्या वतीने दर्शन बारीत शिवभक्तांना फराळ वाटपाच्या कार्यक्रमात धनंजय मुंडे मोठ्या उत्साहाने सहभागी होऊन फराळ वाटप करताना दिसून आले. यावेळी यांच्यासह आ. संजय दौंड, अजय मुंडे,मुख्याधिकारी अरविंद मुंडे बाजीराव धर्माधिकारी, अभय मुंडे, नितीन कुलकर्णी, अनंत इंगळे, आदींची उपस्थिती होती.
जिरेवाडीच्या सोमेश्वर महाराजांची पालखी वाहिलीदरम्यान सकाळी धनंजय मुंडे यांनी जिरेवाडीच्या ग्रामदैवत सोमेश्वर देवस्थानच्या पालखीचे दर्शन घेतले दरवर्षी महाशिवरात्री दिवशी ही पालखी जिरेवाडी येथून परळीत श्री वैद्यनाथ प्रभूंच्या विसाव्यास येत असते. यावेळी 'सोमेश्वर महाराज की जय' व 'हर हर महादेव'च्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला होता.