बीड : जिल्ह्यात लक्षणे नाहीत, परंतु कोरोनाबाधित असलेल्या लोकांची संख्या जवळपास ५५ टक्केपेक्षा अधिक आहे. हे लोक रुग्णालयात राहून उपचार करण्यापेक्षा होम आयसोलेशनची परवानगी मागतात. आरोग्य विभागही सर्व कार्यवाही पूर्ण करून परवानगी देते. परंतु घरी गेल्यानंतर हे लोक काळजी घेत नाहीत. एवढेच नव्हे, तर जास्त त्रास व्हायला लागल्यावर रुग्णालयात धाव घेतात. येथे उपचारास उशीर झाल्यानंतर त्यांचा मृत्यू होत आहे.
जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने शासकीय रुग्णालयांत खाटांची संख्या अपुरी पडत आहे. त्यातच लक्षणे नसल्याने लोक घरीच राहून उपचार घेतात. यात ५० पेक्षा जास्त वय असलेल्या लोकांचाही समावेश असतो. त्यामुळे केअर टेकरने नियमित लक्ष ठेवून थोडाही त्रास जाणवल्यास रुग्णाला रुग्णालयात दाखल करावे.
आरोग्य विभागाची यंत्रणा अपुरी
जिल्ह्यात होम आयसोलेट व होम क्वारंटाईन असलेल्या लोकांवर नजर ठेवण्यासाठी आरोग्य विभागाची यंत्रणा अपुरी पडत आहे. प्रतिबंधात्मक उपाययोजना, सर्वेक्षण आणि उपचारातच ही यंत्रणा परेशान आहे. त्यामुळे स्वत:ची काळजी घेणे आवश्यक आहे.
६० वर्षांवरील वृद्धांना परवानगीच नाही
कोरोनाबाधित आल्यानंतर लक्षणे पाहून रुग्णांना सर्व प्रक्रिया पूर्ण करून होम आयसोलेशनसाठी परवानगी दिली जात आहे. यातही ज्यांचे वय ६० पेक्षा अधिक आहे किंवा कोमॉर्बिड आजार, श्वास घेण्यास त्रास होत असेल, तर त्यांना परवानगी नाकारण्यात येत असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले.
पहिल्या २४ तासांत ३० टक्के मृत्यू
त्रास होत असतानाही काही लोक रुग्णालयात दाखल होण्यास उशीर करत आहेत. रुग्णालयात आल्यापासून पहिल्या २४ तासांत मृत्यू होण्याचे प्रमाण जवळपास ३० टक्के आहे. त्यानंतर ४ दिवसांपर्यंत २० टक्के असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे नागरिकांनी त्रास होण्यापूर्वीच तात्काळ रुग्णालय जवळ करावे, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
जिल्ह्यात सोमवारपर्यंत जवळपास साडेतीन हजार रुग्णांना होम आयसोलेशन दिले होते. त्यांनी त्रास होण्यापूर्वीच रुग्णालयात दाखल व्हावे, अथवा निरीक्षणात असलेल्या डॉक्टरला तत्काळ संपर्क करावा. गैरसमज अथवा भीती बाळगून अंगावर दुखणे काढू नये. होम आयसोलेट लोकांवर नजर ठेवणे कठीण असले, तरी काळजी घेतो.
- डॉ. आर. बी. पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी, बीड.