सोमनाथ खताळ
बीड : पाटोदा तालुक्यातील कुसळंब येथे ग्रामस्थ, मानवलोक संस्था व आरोग्य विभागाच्या समन्वयाने सुरू झालेले कोविड केअर सेंटर आपला वेगळा पॅटर्न तयार करीत आहे. याच सीसीसीच्या धर्तीवर आतापर्यंत १६ ठिकाणी तब्बल ८४५ खाटा तयार झाल्या आहेत. यामुळे कोरोनाबाधितांना आधार मिळत आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर. बी. पवार यांनी मांडलेली ही संकल्पना आता राज्यासाठीही आदर्श ठरत असून सर्वांनी त्याची अंमलबजावणी केल्यास खाटांची अडचण दूर होऊ शकते.
जिल्ह्यात सध्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. रोज १ हजारपेक्षा जास्त नवे रुग्ण आढळत आहेत. यातील सौम्य लक्षणे असणाऱ्यांची संख्या जवळपास ५० टक्के आहे. या सर्वांनाच रुग्णालयात दाखल करताना खाटा अपुऱ्या पडत आहेत. खाटा मिळविण्यासाठी रुग्णांची धडपड सुरू असते. ग्रामीण भागातील रुग्णांचे शहरात येऊन उपचार घेताना अधिक हाल होतात. खाटांची अडचण आणि ग्रामीण भागातील रुग्णांची होणारी अडचण पाहता गावातच सीसीसी सुरू करण्याची संकल्पना जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर. बी. पवार यांनी ग्रामस्थांसमोर मांडली. यासाठी लागणाऱ्या साहित्यासाठी अंबाजोगाईच्या मानवलोक संस्थेची मदत घेतली. या सर्वांच्या समन्वयाने अवघ्या दोन दिवसांत कुसळंबमध्ये तब्बल ५० खाटांचे कोविड सेंटर तयार झाले. सध्या सेंटरमध्ये जवळपास ३० पेक्षा जास्त बाधित रुग्ण उपचार घेत आहेत. ही संकल्पना इतर गावांनी आत्मसात केली. त्यामुळे आज जिल्हाभरात १६ ठिकाणी सीसीसी सुरू झाल्या असून ८४५ खाटा तयार झाल्या आहेत.
औषधी आणि रक्त तपासणीही जागेवरच
कोविड सेंटरमध्ये राहणारे सर्व रुग्ण हे सौम्य लक्षणे असणारी आहेत. त्यांची नियमित रक्त तपासणी केली जाते. तसेच औषधीही वेळेवर दिल्या जातात. ज्यांचे अहवाल चिंताजनक असतील त्यांना तत्काळ ग्रामीण अथवा पुढील आरोग्य संस्थेत रेफर केले जात आहे. सर्व सुविधा जागेवरच उपलब्ध करून दिल्या जात आहेत.
या ठिकाणी सीसीसी तयार
केज तालुक्यातील बनसारोळा, पाटोदा तालुक्यातील कुसळंब, अंबाजोगाई तालुक्यातील घाटनांदूर, बीड तालुक्यातील चौसाळा, आष्टी तालुक्यातील लोणी येथे २, पिपंरखेड, धामणगाव, कडा, टाकळसिंग, अंमळनेर, डोंगरकिन्ही, पारगाव घुमरा, शिरूर तालुक्यातील गोमळवाडा, बीड तालुक्यातील लोळदगाव या सर्व ठिकाणी ५० खाटांची सीसीसी तयार झाली आहे, तर अंबाजोगाईत मानवलोक संस्थेने १०० खाटांची सीसीसी तयार केली आहे.
टीएचओंचे लक्ष्य, एमओंची भेट
ग्रामीण भागातील पहिली सीसीसी सुरू केल्यानंतर इतरांसाठी ती आदर्श ठरावी, यासाठी पूर्ण नियोजन केले जात आहे. पाटोद्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एल. आर. तांदळे हे नियमित आढावा घेऊन प्रत्येक हालचालींवर लक्ष्य ठेवून असतात. तसेच वाहली आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. चैताली भोंडवे यांच्याकडून भेट देऊन त्रुटी दुरुस्त करण्याबाबत सूचना केल्या जातात. तसेच रुग्णांंशी संवाद साधून त्यांना धीर देतात. नोडल ऑफिसर म्हणून डॉ. कागदे आहेत.
कोट
मी संकल्पना मांडली आणि संस्थेकडे शब्द टाकला. यावर सर्वांनीच होकार दिला. त्यामुळे प्रोत्साहन मिळाले. आज जिल्हाभरात उत्स्फूर्तपणे सीसीसी वाढत आहेत. यामुळे खाटांची अडचण दूर होईल. शिवाय बाधितांना जवळच उपचार मिळतील. औषधी व मनुष्यबळ उपलब्ध करून दिले जात आहे. कुसळंब पॅटर्न सर्वांनी अवलंबल्यास कोरोनाबाधितांना खाटांची कमतरता भासणार नाही.
डॉ. आर. बी. पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी, बीड.
===Photopath===
270421\27_2_bed_21_27042021_14.jpeg~270421\27_2_bed_20_27042021_14.jpeg
===Caption===
कुसळंब सीसीसीचा बोर्ड~कुसळंब सीसीसीमधील रूग्णांना आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक असणारा आहार देण्यात आला. यावेळी डीएचओ डॉ.आर.बी.पवार, डॉ.मनिषा पवार, डॉ.चैताली भोंडवे व ग्रामस्थ दिसत आहेत.