सध्या कोरोना संकटामुळे बीड जिल्ह्यातील शेतकरी अडचणीत सापडलेला असून, खरीप आणि रब्बी हंगाम अतिवृष्टीमुळे हाती लागला नाही. सोयाबीन धानाला सोन्याचा भाव असला तरी यंदा शेतकऱ्यांच्या पदरात काहीच पडलेले नाही. मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांनी विमा भरलेला असून, तो तत्काळ मंजूर करून वाटप करावा, अशी मागणी भाजपाचे राज्य प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी केली आहे.
जिल्ह्यातील सत्ताधाऱ्यांनी या प्रश्नावर लक्ष घालण्याची गरज आहे. पंकजा मुंडे या पालकमंत्री असताना बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर पीक विमा आला, याची आठवण त्यांनी यावेळी करून दिली आहे.
कोरोना संकटाचा काळ असून, लॉकडाऊनमुळे सर्व व्यवस्थाही ठप्प आहे. मागच्या वर्षी अतिवृष्टी मोठ्या प्रमाणापर झाली. परिणामी, खरिपाची पिके हाती लागली नाहीत. शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर विमा भरलेला आहे. रब्बी पिकेसुद्धा अवकाळी वादळात सापडली, एकूणच काय तर शेतकरी मेटाकुटीला आला असून, विमा जर लवकर वाटप झाला तर अशा संकटात मदत झाल्याशिवाय राहणार नाही. राज्यात देवेंद्र फडणवीस सरकार असताना आणि पंकजा मुंडे या पालकमंत्री असताना बीड जिल्ह्यासाठी नाही म्हटले तरी दरवर्षी किमान ९०० कोटींपेक्षा जास्त विमा पदरात पडला; मात्र आज एक वर्ष झाले तरी विम्याची साधी दमडीही शेतकऱ्यांना मिळत नाही. त्यामुळे बीड जिल्ह्यातील सत्ताधाऱ्यांनी या प्रश्नावर विशेष लक्ष घालण्याची गरज आहे. बीडचे जिल्हाधिकारी यांनी या प्रश्नावर तत्काळ लक्ष घालावे आणि विमा वाटप करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी राम कुलकर्णी यांनी केली आहे.