माजलगाव : नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे माजलगाव तालुक्यातील पिकांचे अतोनात नुकसान झाले असून गुरुवारी महसूल उपायुक्त पराग सोमण, उपविभागीय अधिकारी नीलम बाफना यांनी तालुक्यातील नुकसानग्रस्त गावांचा दौरा करून पिकांची पाहणी केली. यावेळी विलास साळवे व शेतकऱ्यांनी तातडीने नुकसानभरपाई देण्याची मागणी केली.
मागील पंधरा दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या तोंडातील घास हिरावला. शेतातील उभ्या पिकांचे पाण्यामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. या नुकसानीची पाहणी करण्याचे शासनस्तरावर आदेश असल्याने गुरुवारी औरंगाबाद येथून महसूल उपायुक्त पराग सोमण यांनी माजलगाव तालुक्याचा दौरा केला. शेतकऱ्यांचे हे नुकसान मोठे झाल्याने या विषयीचा अहवाल ते शासनाकडे सोपवणार आहेत. यावेळी त्यांच्यासमवेत उपविभागीय अधिकारी नीलम बाफना, मंडळ अधिकारी पद्माकर मुळाटे, तलाठी मडकर, केसापुरीचे माजी सरपंच विलास साळवे, कांता पवार, सगीर देशमुख, मुंजाबा साबळे, अनिल फुलारी, विठ्ठल साबळे, महादेव जाधव, सचिन लहाडे, शिवाजी जोगडे, पप्पू भारसावडे यांच्यासह शेतकऱ्यांची उपस्थिती होती.
-----
फुललेले सोयाबीन, सडलेला कापूस
केसापुरी, पात्रुड, नित्रुड आदी गावांतील शेतांतील सोयाबीन, कापूस, ऊस, तूर या पिकांची उपायुक्तांनी पाहणी केली. यावेळी त्यांना केसापुरी येथे सोयाबीनला फुले आलेली, कापूस सडलेला, तूर, बाजरी, तीळ ओंबाळून गेल्याचे दिसून आले. या पिकांमध्ये अद्यापही पाणी साचलेले दिसून आले.
230921\purusttam karva_img-20210923-wa0003_14.jpg