अविनाश मुडेगांवकर
अंबाजोगाई : मांजरा धरण तुडूंब भरले तरीही अद्याप कालव्यांची दुरूस्ती व देखभाल वेळेत न झाल्याने धरणातील पाणी सोडता येईना, परिणामी शेतकऱ्यांना पिकांना पाणी देण्यासाठी नितांत आवश्यकता असतांनाही प्रशासनाच्या वेळकाढू भूमिकेमुळे कालव्यातून पाणी सोडण्यासाठी विलंब लागत आहे.
तब्बल चार वर्षानंतर कोरडे पडलेले मांजरा धरण पूर्ण क्षमतेने भरले. मात्र, धरण प्रशासनाने मार्च, एप्रिलमध्ये कामे न केल्याने अजूनही कालवे दुरूस्तीच्या प्रतीक्षेत आहेत. कालव्यात मोठमोठी झाडेझुडपे वाढली आहेत. तर अनेक ठिकाणी झालेल्या मोठ्या पावसामुळे कालवे फुटले आहेत.
पेरण्या होऊन दीड महिन्यांचा कालावधी झाल्यामुळे अनेक ठिकाणची पिके आता सुकू लागली आहेत. तर अनेक ठिकाणच्या उसाला पाण्याची आवश्यकता आहे. दोन आठवडयात पाणी सुटले नाही तर मोठे संकट उद्भवणार आहे. मांजरा धरणाचे अधिकारी कालव्याच्या दुरूस्त्या रखडल्याचे कारण न सांगता शेतकऱ्यांकडूनच पाण्यासाठी मागणी नाही असे कारण पुढे करू लागले आहेत.
कालवा सल्लागार समितीची बैठकच नाही
धरणातील पाणी शेतकऱ्यांना सिंचनासाठी सोडण्यासाठी मांजरा धरण प्रशासनाच्या वतीने कालवा सल्लागार समितीची बैठक घेऊन पाणी सोडण्याबाबतचा निर्णय घेतला जातो. या बैठकीत दक्षतेची उपाययोजना तसेच शेतकऱ्यांना असणाऱ्या पाण्याची आवश्यकता, पाणी सोडण्याचा कालावधीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय होतात. मात्र अद्यापहीही बैठक न झाल्याने पाणी सोडण्याचा कालावधी लांबत चालला आहे.
धरणातून पाणी लवकर सोडावे
मांजरा धरणाच्या डाव्या कालव्यावर १० हजार ५५८ हेक्टर शेतजमीन सिंचनाखाली येते. यात आवाड शिरपुरा, नायगाव,सौंदणा,इस्थळ, आपेगाव,धानोरा (खु.), कोपरा - अंजनपूर, देवळा, पाटोदा, ममदापूर, आकोला,मुडेगाव, सुगाव, तडोळा, या गावांसह इतर गावांचा समावेश आहे. या परिसरातील पिकांना पाणी लवकर सोडण्यात यावे. अशी मागणी शेतकरी मधुसुदन कुलकर्णी यांनी केली आहे.
धरणातील पाणी लवकरच सोडणार
मांजरा धरणातून सिंचनासाठी सोडण्यात येणारे पाणी शेतकऱ्यांना देण्याबाबत विचार विनिमय सुरू असून या पूर्वीची कामे प्रगतीपथावर आहेत. दुरूस्त्या लवकरच पूर्ण होतील. त्यानंतर सल्लागार समितीच्या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार धरणातून कालव्यात पाणी सोडले जाईल. अशी माहिती मांजरा धरणाचे अभियंता शाहूराव पाटील यांनी लोकमतशी दिली आहे.
शेतकऱ्यांची अपेक्षा फोल
यावर्षी सर्वत्र चांगला पाऊस झाल्याने पेरण्या ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये आटोपल्या. गहू, ज्वारी, हरभरा, करडई व उसाची लागवड शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात केली.हरभरा, गहू, ज्वारीच्या पेरणीचा दीड महिन्यांपेक्षा जास्त कालावधी उलटला. आता पिकांना पाण्याची नितांत आवश्यकता आहे. सर्वच शेतकऱ्यांकडे विहिरी व इंधन विहिरी नाहीत. त्यामुळे अनेक शेतकरी आजही धरणाच्या पाण्यावर अवलंबून आहेत. त्यांची अपेक्षा फोल ठरली.