परळी ( बीड ) : देशातील बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या येथील प्रभू श्री वैद्यनाथाच्या दर्शनासाठी दिवाळीत भक्तांच्या रांगा लागल्या आहेत. शेकडो भाविकांनी श्री वैद्यनाथाचे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मनोभावे दर्शन घेतले. यावेळी कोरोना नियमांचे पालन करत सर्व भाविक दर्शन घेत असल्याचे दिसले.
कोरोनाची लाट ओसरल्याने या दिवाळीला भाविकांची वैजनाथ मंदिरात दर्शनासाठी गर्दी होती. वैद्यनाथ मंदिरात लक्ष्मीपूजनाच्या दिवशी दर्शन घेण्यासाठी सकाळपासूनच भाविकांची गर्दी होती. सकाळी 8 नंतर भाविकांच्या संख्येत वाढ झाली. भक्तांच्या रांगा लागल्या होत्या. शहरातील मोंढा मार्केट भागातही दिवाळीच्या खरेदीसाठी बुधवारपासून नागरिकांची गर्दी झाली होती. शहर नागरिकांनी गजबजले होते. कापड दुकान, स्वीट होम, सोने-चांदीच्या दुकानात गर्दी होती. तसेच लक्ष्मीपूजनाचे साहित्य खरेदी करण्यासाठीही नागरिकांची झुंबड उडाली होती. फळे ,फुले घेण्यासाठी नागरिकांचा प्रतिसाद होता. यंदा मात्र झेंडूच्या फुलांचा भाव घटला होता. चाळीस रुपये किलो झेंडूच्या फुलांची विक्री चालू होती. झेंडू फुलांचे भाव पडल्याने झेंडू विक्रेत्या शेतकऱ्यांची निराशा झाली होती. परंतु, दोन दिवसापासून परळी बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी झाली होती.
-
पाडव्याचा गायन कार्यक्रम रद्द कोरोनामुळे दिवाळी पाडव्याला होणार गायन कार्यक्रम वैजनाथ मंदिर ट्रस्टने यंदा रद्द केला आहे. गेल्या वर्षी ही कार्यक्रम घेण्यात आला नव्हता.. त्यापूर्वी दिवाळी पाडव्याच्या दिवशी मंदिराच्या पायऱ्यावर गायन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत होते. - राजेश देशमुख ,सचिव -वैजनाथ मंदिर ट्रस्ट परळी
माजी विद्यार्थी संघ परळीचे सर्व सदस्य मागील 22 वर्षांपासून प्रत्येक दिवाळीला वैद्यनाथ मंदिर येथे भेट घेत असतात. यंदाही दिवाळीला सर्व मित्र जमले होते. - अश्विन मोगरकर, परळी
दर दिवाळीला मूळगावी परळीला येतो, प्रभू वैद्यनाथाचे दर्शनानिमित्त सर्व मित्र भेटतात आनंद वाटतो -समीर कुलकर्णी, भाविक, ठाणे