सार्वजनिक शौचालयांची दुरवस्था
अंबाजोगाई : अंबाजोगाई शहरातील सार्वजनिक शौचालयांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. काही ठिकाणी दरवाजे व खिडक्या तुटून पडल्या आहेत. यामुळे नागरिकांची मोठी कुचंबणा होत आहे. नगर परिषदेने लाखो रुपये खर्च करून उभारलेल्या शौचालयांची मोडतोड होत आहे. तसेच शौचालयांची स्वच्छता वारंवार होत नसल्याने वाढत्या दुर्गंधीमुळे तिकडे जाणे टाळले जाते. स्वच्छता विभागाने याकडे लक्ष देऊन शौचालयांची दुरवस्था दूर करावी, अशी मागणी शहरवासीयांमधून होत आहे.
महिला बचत गट आर्थिक संकटात
अंबाजोगाई : आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील अनेक महिलांनी बचत गटांची स्थापना केली. परंतु आर्थिक पाठबळ उपलब्ध होत नसल्याने स्वयंरोजगार उभारण्यासाठी महिला बचत गटांना विविध अडचणींचा मोठा सामना करावा लागत आहे. महिला बचत गटांच्या माध्यमातून काही वस्तू तयार करण्यात आल्या. तर त्या वस्तूंना योग्य बाजारपेठही उपलब्ध होत नसल्याने वस्तूंची विक्री रखडते व मोठ्या प्रमाणात भांडवल अडकून पडते. यामुळे महिला बचत गट आर्थिक संकटात सापडले आहे.
शेतकरी कर्जमाफीच्या लाभापासून वंचित
अंबाजोगाई : अंबाजोगाई तालुक्यातील शेकडो शेतकरी अद्यापही शासनाच्या कर्जमाफी योजनेपासून वंचित आहेत. दोन लाख रुपयांपेक्षा जास्त कर्ज असलेल्या थकबाकीदार शेतकऱ्यांना कर्जमाफीची प्रतीक्षा आहे. २७ डिसेंबर २०१९ रोजी राज्य शासनाने राज्यातील शेतकऱ्यांसाठी महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनेची घोषणा केली होती. यामध्ये शेतकऱ्यांना टप्याटप्याने कर्जमाफी मिळणार होती. परंतु मध्यंतरीच्या कोरोनाच्या उद्भवलेल्या संकटामुळे ही योजना लांबली. याचा मोठा फटका अंबाजोगाई तालुक्यातील शेतकऱ्यांना बसला आहे. या वंचित शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ मिळावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अॅड. संतोष लोमटे यांनी केली आहे.
तंटामुक्त गाव समित्या कागदावरच
अंबाजोगाई : अंबाजोगाई तालुक्यातील अनेक गावांना महात्मा गांधी तंटामुक्त ग्राम पुरस्कार प्राप्त झाला आहे. मात्र, पुरस्कार प्राप्त झालेल्या गावांमध्ये अनेक वाद विवाद उद्भवत आहेत. तसेच तालुक्यातील अनेक गावांमध्ये अवैध धंदे सुरू असल्याने तंटामुक्त समितीचा बोजवारा उडत आहे. तंटामुक्त समितीमध्ये निवड होण्यासाठी चढाओढ लागते. परंतु प्रत्यक्ष कामाकडे मात्र, या समितीतील सदस्यांचे दुर्लक्ष होत आहे.
निवडणुकीमुळे जेवणावळी वाढल्या
अंबाजोगाई -: ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर होताच ग्रामीण भागातील हॉटेल, धाबे, हाऊसफुल्ल झाले आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढलेला असतांनाही जेवणावळीला गर्दी होत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून बंद असलेल्या हॉटेल्स व धाबा चालकांना मात्र, या निवडणुकीमुळे अच्छे दिन आले आहेत. ग्रामीण भागातील मतदार आता ग्रामीण भागापेक्षा शहरी भागातच हॉटेलला मोठ्या प्रमाणात पसंती देऊ लागले आहेत.