कमी दाबाने पाणी
बीड : शहरातील ईदगाह पाणी टाकी ते कनकालेश्वर मंदिर, नाळवंडी रोड, तेलगाव नाकापर्यंत मुख्य पाईपलाईनवर काही नागरिकांनी नळजोडणी केली असल्याने कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. ही नळजोडणी बंद करावी, अशी मागणी नगरसेविका शेख बिसमिल्लाह आणि हाफीज अशफाक यांनी केली आहे.
ढगाळ वातावरणाने शेतकरी हवालदिल
बीड : दोन दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. सोमवारी बीड परिसरात भुरभुर झाली. हे वातावरण गहू, हरभरा या पिकांसाठी पोषक नसून, नुकसानीची चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे. ज्वारीच्या पिकावरही मावा, तसेच चिकटाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.
पथदिवे बंदच
वडवणी : शहरातील मुख्य भागातील तसेच गल्ली बोळातील काही भागात रस्त्यावरील पथदिवे बंद आहेत. त्यामुळे रात्रीच्या वेळी चालणे अवघड होऊन बसले आहे. तसेच भुरट्या चोऱ्यांच्या संख्येत देखील वाढ होत आहे. पथदिवे सुरू करून नागरिकांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
वडवणी बसस्थानकात कचऱ्याचे ढिगारे
वडवणी : बसस्थानकाभोवती मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे ढिगारे पडून आहेत. परिसरातील व्यापारी आणि नागरिक येथे कचरा आणून टाकत आहेत. याकडे संबंधितांचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे दुर्गंधीचा त्रास येथील प्रवाशांना सहन करावा लागत आहे. स्वच्छतेची मागणी होत आहे.
तलाठी शोधण्याची वेळ
पाटोदा : तालुक्यातील अनेक तलाठी कार्यालयाच्या इमारतीत मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य आहे. काही ठिकाणच्या इमारती अनेक महिन्यांपासून धूळ खात असून महसूल यंत्रणेचे दुर्लक्ष होत आहे. तलाठी नसल्यामुळे शेतकऱ्यांच्या कामांचा खोळंबा होत आहे. सज्जावर तलाठ्यांना थांबण्याची सक्ती करण्याची मागणी होत आहे.