परळी (बीड): आषाढी एकादशीनिमित्त परळीत भाविकांनी वैद्यनाथ, विठ्ठल अन संत जगमित्र मंदिरात दर्शनासाठी गर्दी केली आहे. पहाटेपासून प्रभू वैद्यनाथाच्या दर्शनासाठी भाविकांची रीघ लागली आहे.
संत जगमित्र नागा मंदिरात पहाटे पाच वाजता मंदिर पुजारी उदय औटी, कल्याणी औटी यांच्या हस्ते सपत्नीक महापूजा झाली. विठ्ठल रुक्माईस अलंकृत केले व मंदिराची सजावट करण्यात आली. तसेच शहरातील आंबेवेस, जाजुवाडी, शिवाजीनगर, गणेशपार येथील तसेच ग्रामीण भागातील अनेक ठिकाणच्या विठ्ठल मंदिरात दर्शनासाठी भाविकांची रीघ लागली आहे. आषाढी एकादशीच्या दिवशी ज्या भाविकांना दर्शनासाठी पंढरपूरला जाणे शक्य होत नाही असे भाविक येथील श्री संत जगमित्र नागा महाराज समाधी स्थळ आणि विठ्ठल रुक्माईच्या दर्शनास गर्दी करतात, असे पुजारी उदय औटी गुरुजी यांनी सांगीतले.
देशातील बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या श्री प्रभू वैद्यनाथाच्या मंदिरातही आज भाविकांची गर्दी होती. विशेष म्हणजे, विदर्भातून आषाढी वारीसाठी श्रीक्षेत्र पंढरपूर येथे विठ्ठलाच्या दर्शनासाठी निघालेल्या दिंड्या श्री प्रभू वैद्यनाथांच्या व श्री संत जगमीत्र नागा मंदिराच्या दर्शनासाठी येतात व पुढे प्रस्थान करतात. परळी तालुक्यातील नंदागौळ येथील श्री क्षेत्र विठ्ठल टेकडी देवस्थान आहे. येथे ही दर्शनासाठी परिसरातील भाविकांची गर्दी झाली आहे. नंदागौळ येथील टेकडीवर विठोबाने वाघ्ररूपात संत जगमित्राला दर्शन दिल्याची आख्यायिका आहे. त्यामुळे परळीस वेगळे महत्व प्राप्त झाले आहे, असे संतवाड्.मयाचे संशोधक ह.भ.प.ॲड दत्तात्रय महाराज आंधळे यांनी सांगितले.