धारुर : धारूर येथील ग्रामीण रुग्णालयात कोविड लस उपलब्ध नसल्याने तेरा दिवसांपासून लसीकरण बंद होते. लस उपलब्ध झाल्यावर दुसरा डोस वाले वंचित असल्याने त्यांना अगोदर देण्यात आली. सोमवारपासून पहिल्या डोसवाल्यांना लस देण्यास सुरुवात करताच लसीकरणासाठी मोठी गर्दी लसीकरण केंद्रावर झाली. येथे कर्मचारी अपुरे असल्याने आरोग्य विभागाची मात्र व्यवस्था लावताना तारांबळ उडत होती.
लसीकरणासाठी शहरात दोन केंद्रे करावीत, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
धारुर ग्रामीण रुग्णालयात कोविड लसीचा पुरवठा नसल्याने रुग्णालयाच्या वतीने कोविड लसीचा पहिला डोस बंद करण्यात आला होता. मागील काही दिवसांपूर्वी कोविड लसीचा पहिला डोस घेतलेल्या नागरिकांसाठी दुसरा डोस देण्यासाठी काही लस आरक्षित ठेवण्यात आल्या आहेत. धारुर ग्रामीण रुग्णालयात कोविड लस उपलब्ध झाल्याने तेरा दिवसांच्या खंडांनंतर २६ एप्रिलपासून पुन्हा कोविड लसीचा पहिला डोस देण्यास सुरुवात झाली. लसीकरणाच्या पहिल्याच दिवशी शहर, तसेच तालुक्यातील नागरिकांनी कोविडची पहिली लस घेण्यासाठी मोठी गर्दी केली.
गर्दी झाल्यामुळे लसीकरण केंद्रातील कर्मचाऱ्यांची धांदल उडाल्याचे पाहावयास मिळाले. लसीकरण केंद्रावरील ही गर्दी टाळण्यासाठी आणखी एका लसीकरण केंद्राची गरज असून, कोविड सेंटरवर व लसीकरण केंद्रावर काम करण्यासाठी कर्मचाऱ्यांचीही गरज आहे. त्यामुळे कार्यालयाने या बाबींकडे लक्ष देऊन किल्लेधारुर येथे आरोग्यसेवेसाठी कर्मचारी पुरविणे गरजेचे आहे. आतापर्यंत कोविशिल्ड लसीचे पहिला डोस-२,१४३, दुसरा डोस-१,१६६ तर कोवॅक्सिन लसीचे पहिला डोस-७०१, दुसरा डोस १८० असे एकूण ४,१९० डोस देण्यात आल्याची माहिती ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.चेतन आदमाने यांनी दिली.
===Photopath===
270421\img_20210426_104128_14.jpg