बीड : जिल्ह्यातील सर्वच तहसील कार्यालयात लॉकडाऊन काळात पास देण्याची ऑनलाइन व ऑफलाइन व्यवस्था करण्यात आली आहे. या प्रवास पाससाठी कारण महत्त्वाचे असून, त्यासाठीच पास दिला जाणार आहे. मात्र, क्षुल्लक कारणासाठीही पासची मागणी वाढू लागल्याने, तहसील प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे, तर गरजूंना पास तत्काळ देण्यात यावेत, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिलेले आहेत. मात्र, काही कर्मचाऱ्यांकडून नागरिकांना योग्य उत्तर दिले जात नसल्यामुळे नागरिकांमधून रोष व्यक्त केला जात आहे.
शुक्रवारी लॉकडाऊनचा पहिला दिवस होता. त्याच दिवशी प्रवासी पाससाठी मोठी गर्दी जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालयात होती. जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालयातून पासची व्यवस्था केल्याचे जिल्हा प्रशासनाने जाहीर केले आहे. मात्र, त्यासाठी ऑनलाइन मदत केंद्र व पास केंद्र याची पूर्व तयारी करणे गरजेची होती. पूर्वतयारी न झाल्याने नागरिकांनी पाससाठी ई-मेलवर मागणी केल्यानंतरही योग्य प्रतिसाद मिळून येत नव्हता, तर व्हॉट्सॲपच्या नंबरवरूनही प्रतिक्रिया दिली जात नव्हती. त्यामुळे संबंधित तहसील कार्यालयात पासच्या मागणीसाठी ऑफलाइन गर्दी होत आहे. त्यामुळे नागरिकांच्या अडचणीत वाढ झाली असून, नियोजन न केल्यामुळे अधिकारी, कर्मचारीही भांबावले आहेत. त्यामुळे पास यंत्रणा सुरळीत करण्यासाठी प्रशासनाकडून एकखिडकी कार्यक्रम राबविणे गरजेचे आहे, तर जास्तीतजास्त प्रवासी पास हे ऑनलाइन दिले, तर नागरिकांची सोय होईल व गर्दी होणार नाही, अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.
सुसूत्रता आणणे गरजेचे
लॉकडाऊन करण्यापूर्वी जिल्हा प्रशासनाकडून नियोजन करण्यात आले होतो. त्या संदर्भात सर्व तहसीलदारांना जिल्हाधिकारी यांनी सूचनाही दिल्या होत्या. त्या पद्धतीने तहसील कार्यालयात ईमेल आयडी, व्हॉट्सॲप क्रमांक, तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील हेल्पलाइन यांचे नंबर नागरिकांपर्यंत पोहोचविणे गरजेचे होते. त्यामुळे पास व्यवस्थेत सुधारणा करून सुसूत्रता आणणे गरजेचे असल्याचे मत नागरिकांमधून व्यक्त केले जात आहे.
लॉकडाऊन नागरिकांसाठीच
लॉकडाऊन कोरोना संसर्ग वाढू नये, यासाठी केलेले आहे. त्या संदर्भात जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. संसर्ग कमी होताच टप्प्याटप्प्याने शिथिल करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले होते. त्यामुळे नागरिकांनी लॉकडाऊनच्या नियमांचे पालन करावे व क्षुल्लक कारणास्तव प्रवासी पासचा हट्ट धरू नये, कोरोना काळात आपली व कुटुंबाची काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.