- संजय खाकरे
परळी : महाशिवरात्रीसाठी देशातील बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या येथील श्री प्रभू वैद्यनाथाचे दर्शनासाठी परळीत भक्तांचा जनसागर उसळला आहे. महाशिवरात्रीच्या पुण्यपर्व काळात श्री प्रभू वैद्यनाथाचे दर्शन लाखो भाविक घेत आहेत, हर हर महादेव, श्री वैद्यनाथ भगवान की जय असा जयघोष करत भक्त वैद्यनाथाचे दर्शन घेत आहेत. शहरात येणाऱ्या भक्तांच्या स्वागतासाठी शहरात विविध ठिकाणी कमानी उभारण्यात आल्या आहेत. तसेच विविध सामाजिक संघटनेच्या वतीने अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली आहे. महाशिवरात्रीच्या अनुषंगाने परळीत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
येथील वैद्यनाथ मंदिरात महाशिवरात्रीचे दर्शन घेण्यासाठी सकाळपासूनच भाविकांची मोठी गर्दी झाली, महिला पुरुष व पासधारक अशा स्वतंत्र रांगा लावण्यात आल्या, सर्वांना दर्शन घेणे सुलभ जावे म्हणून वैद्यनाथ मंदिराच्या पायऱ्यावर लोखंडी बॅरिकेट्स लावण्यात आले आहेत. यामधून वैद्यनाथ मंदिराच्या आत येत आहत व रांगेत थांबून भाविक वैद्यनाथाचे दर्शन घेत आहेत, मंदिरात हर हर महादेव चा गजर चालू आहे .मंदिराच्या प्रांगणात सनई -चौघडा वादन चालू आहे. देवस्थान ट्रस्टच्यावतीने भाविकांसाठी पिण्याचे पाण्यासह अनेक सोयी उपलब्ध करण्यात आल्या असल्याची माहिती श्री वैद्यनाथ मंदिर सचिव राजेश देशमुख यांनी दिली आहे. मंदिर परिसरात 300 पोलीस अधिकारी कर्मचारी बंदोबस्तावर आहेत. अंबाजोगाईचे उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस, परळी चे पोलीस निरीक्षक हेमंत कदम, बाळासाहेब पवार, श्रीराम पेलगुरवार यांच्या सह इतर पोलीस अधिकारी यांची येथे उपस्थिती आहे.
राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री ना धनंजय मुंडे आणि त्यांच्या मातोश्री रुक्मिणीबाई मुंडे, आमदार संजय दौंड, जिप अध्यक्षा शिवकन्या सिरसाठ, अजय मुंडे तसेच राज्याच्या माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांनी दुपारी प्रभू वैद्यनाथाचे दर्शन घेतले. यावेळी विश्वस्त राजेश देशमुख , विजयकुमार मेनकुदळे, प्रा प्रदीप देशमुख, नंदकिशोर जाजू उपस्थित होते.